बिहार निकाल म्हणजे पंतप्रधानांविरुद्ध जनतेचा संताप

By admin | Published: November 9, 2015 11:19 PM2015-11-09T23:19:26+5:302015-11-09T23:23:35+5:30

बिहार विधानसभा निवडणुकीत ८० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे(राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी निकालाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मोदींवर तोफ डागली

Bihar's outcome means the anger of the people against the Prime Minister | बिहार निकाल म्हणजे पंतप्रधानांविरुद्ध जनतेचा संताप

बिहार निकाल म्हणजे पंतप्रधानांविरुद्ध जनतेचा संताप

Next

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत ८० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे(राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी निकालाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मोदींवर तोफ डागली. बिहार निवडणुकीचे निकाल म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध लोकांनी व्यक्त केलेला संताप आहे, असे लालूप्रसाद सोमवारी म्हणाले.
देशभर मोदींविरुद्ध संताप आहे. बिहार निवडणूक निकालांनी देशवासीयांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे. आजघडीला देशात सगळ्यांना असुरक्षित वाटू लागले आहे. इतके वाईट दिवस येतील, हा विचार स्वप्नातही लोकांनी केला नव्हता. लोकांना गंडवले गेले. खोट्या आश्वासनांच्या खैरातीवर समाजातील प्रत्येक वर्गाची दिशाभूल केली गेली. याचेच फळ भाजपाला मिळाले, असे ते म्हणाले.
विरोधकांच्या एकजुटीमुळे पराभव
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ)च्या पराभवासाठी दुसरेतिसरे काहीही कारण नसून विरोधकांची एकजूट जबाबदार आहे. या निवडणुकीतील रालोआच्या पराभवामुळे आर्थिक सुधारणांच्या प्रक्रियेवर कुठलाही परिणाम होणार नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान स्पष्ट केले.
बिहारचे निकाल अर्थव्यवस्थेसाठी धक्का आहे,असे मला वाटत नाही. पायाभूत सुधारणा प्रक्रियेवर यामुळे कुठलाही प्रतिकूल परिणाम होणारा नाही. ही प्रक्रिया त्याच वेगात सुरू राहील, असे जेटली म्हणाले. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी निवडणूक काळात केलेल्या बेजबाबदार वक्तव्यांनी चित्र बदलले, हे खरे आहे. पण बिहारच्या पराभवामागे केवळ हेच एक कारण नाही. या पराभवामागे विरोधकांची एकजूट हे सर्वांत मोठे कारण आहे. याचमुळे जदयू, राजद, काँग्रेस महाआघाडी जिंकली,असेही जेटली म्हणाले.
बिहार निवडणूक ही केंद्र सरकारच्या धोरणांवरील ‘जनमत चाचणी’ होती का? असे विचारले असता जेटलींनी नकारार्थी उत्तर दिले.
कुठल्याही राज्याची निवडणूक जनमत चाचणी असू शकत नाही. कारण तुम्ही कुठल्याही एका मुद्यावर निवडणूक लढत नसता, असे ते म्हणाले. विविध विरोधी पक्ष एका छत्राखाली आल्याने भाजपाच्या मतांचे विभाजन झाले आणि त्याचा थेट लाभ महाआघाडीस झाला, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
शत्रुघ्न सिन्हा यांची कुत्र्याशी तुलना : विजयवर्गीय पुन्हा वादात
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत रालोआचा दारुण पराभव होऊन २४ तास लोटत नाही तोच पक्षाचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनी स्वपक्षाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची कुत्र्याशी तुलना करीत पुन्हा एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. भाजपाचे सरचिटणीस आणि बिहार निवडणुकीसाठी व्यूहरचनाकार राहिलेले विजयवर्गीय यांनी सिन्हा यांना कुत्र्याची उपमा देण्याच्या काही दिवसांपूर्वीच सुपरस्टार शाहरुख खानलाही लक्ष्य करून वादग्रस्त वक्तव्य केले होते. तथापि त्यांनी नंतर हे वक्तव्य मागे घेतले होते. भाजपा नेत्याने कुत्र्याची उपमा वापरण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी हरियाणाच्या फरिदाबादेतील दलित हत्याकांडावरून कुत्र्याची उपमा दिली होती. विजयवर्गीय म्हणाले, ‘भाजपामुळेच सिन्हा यांची राजकारणात ओळख आहे.
सिन्हांमुळे भाजपाची ओळख नाही. आपली पक्षनिष्ठा किती आहे, हे त्यांनी स्वत:च ठरवावे. पक्षाने खूपकाही दिले असतानाही तुम्ही पक्षाचे नुकसान करता. त्यांच्या अशा वागण्याला माझा विरोध आहे. विजय किंवा पराभवादरम्यानच्या वागण्यावरून माणसाचा अंदाज घेता येतो.
पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते परिश्रम घेतात, लोकशाहीत हार-जित चालायचीच. पण निवडणूक जिंकल्यावर किंवा हरल्यावरच एखाद्याची खरी ओळख होते.’ (वृत्तसंस्था)


आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून सादर करण्यात आले असते तर बिहार निवडणुकीचे निकाल काही वेगळेच लागले असते आणि रालोआच्या पराभवासाठी जबाबदार असलेल्यांना धडा शिकविलाच पाहिजे, असे शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता विजयवर्गीय म्हणाले,‘जेव्हा एखादी बैलगाडी चालते तेव्हा तिच्याखालून कुत्राही चालत असतो. परंतु बैलगाडी माझ्याच बळावर चालत आहे, असे कुत्र्याला वाटते. भाजपा कुणा एका व्यक्तीच्या भरवशावर चालत नाही. पक्ष संपूर्ण संघटन आहे. जे पक्षाच्या बाहेर आहेत ते मौन व्रत धारण करून होते आणि आता ते बोलू लागले आहेत.’

Web Title: Bihar's outcome means the anger of the people against the Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.