बिहारचा बिगुल दिवाळीपूर्वी वाजणार
By admin | Published: May 18, 2015 02:57 AM2015-05-18T02:57:48+5:302015-05-18T02:57:48+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी एकजूट जनता परिवार सज्ज झाला असताना येत्या सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये राज्यात
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी एकजूट जनता परिवार सज्ज झाला असताना येत्या सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये राज्यात २४३ जागांसाठी निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी यांनी रविवारी याबाबतचे संकेत दिले. तथापि ही निवडणूक किती टप्प्यात होईल, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे.
निवडणुकीदरम्यान धन व शक्तीचा गैरवापर रोखण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात केंद्रीय सुरक्षा दलांची तैनाती केली जाणार आहे. दलांचा पुरेसा फौजफाटा उपलब्ध झाल्यानंतर सप्टेंबर ते आॅक्टोबरमध्ये कुठल्याही क्षणी बिहार निवडणूक होऊ शकते, असे जैदी म्हणाले.
३१ जुलैपर्यंत मतदार याद्या तयार होतील. यानंतर मान्सूनची स्थिती, पूर, सणवार, परीक्षा, सुट्या आदींचा विचार करून निवडणुकीचे निश्चित वेळापत्रक तयार केले जाईल. पैशाचा गैरवापर ही बिहारातील मोठी समस्या आहे. त्यामुळे यावेळी निवडणूक आयोग आधीपेक्षा अधिक सतर्क असेल. कायदा मंत्रालयाकडून काही कायदेशीर तरतुदी यायच्या आहेत. मात्र, आमच्याकडे असलेल्या अधिकारांतर्गत निवडणूक खर्चावर अंकुश ठेवण्याचे काम आयोग चोख बजावेल, असेही ते म्हणाले.
मतांसाठी पैसे, भेटवस्तू व मद्य वाटप करण्याऱ्या आणि ‘चॅनल’ रूपात काम करणाऱ्या व्यक्तीकडे आमचे विशेष लक्ष असेल. यादृष्टीने नियोजन अद्यापही सुरूआहे. निवडणुकीतील पैशाच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवणारी नवी प्रणाली आम्ही लवकरच जारी करू, असेही त्यांनी सांगितले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)