उद्घाटनासाठी भाजप आमदार नारळ फोडायला गेल्या, नारळ तसाच राहिला, रस्ता उखडला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 01:52 PM2021-12-03T13:52:27+5:302021-12-03T13:58:18+5:30
उद्घाटनावेळीच दिसून आला रस्त्याचा दर्जा; चौकशीसाठी समिती स्थापन
लखनऊ: एखाद्या रस्त्याचं, इमारतीचं, प्रकल्पाचं उद्घाटन करताना नारळ फोडण्याची परंपरा आहे. नारळ वाढवून भूमिपूजन करण्याची, उद्घाटन करण्याची आपली संस्कृती आहे. मात्र उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये भ्रष्टाचाराचा एक भलताच प्रकार समोर आला आहे. बिजनौरमध्ये रस्त्याचा शुभारंभ करण्याआधी नारळ वाढवण्याचा कार्यक्रम सुरू होता. मात्र नारळ फुटलाच नाही. त्याऐवजी रस्त्याचं मात्र नुकसान झालं. त्यामुळे रस्त्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचं उद्घाटनाच्या कार्यक्रमातच समोर आलं. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामाची चौकशी होण्याची शक्यता आहे.
बिजनौरमध्ये सिंचन विभागानं कालव्याजवळ एक रस्ता तयार केला. त्यासाठी १ कोटी १६ लाख रुपये खर्च आला. एकूण ७ किलोमीटरचा रस्ता तयार करून कडापूर, झालपूर, उलेढा आणि हिमपूरला जोडण्याची योजना आहे. मात्र त्यापैकी केवळ ७०० मीटर रस्त्याचंच काम पूर्ण झालं आहे. त्याच्या उद्घाटनासाठी आमदार सूची मौसम चौधरींना बोलावण्यात आलं. काल संध्याकाळी त्या पतीसोबत उद्घाटनासाठी पोहोचल्या.
विधिवत पूजा केल्यानंतर त्यांना नारळ वाढवण्यास सांगितलं गेलं. आमदारांनी नारळ फोडण्यासाठी तो जमिनीवर आपटला. मात्र नारळ फुटलाच. मात्र त्याऐवजी रस्ता उखडला. डांबराचे तुकडे उडाले. त्यानंतर आमदार नाराज झाल्या. उद्घाटनाचा कार्यक्रम सोडून त्या निघून गेल्या.
त्यानंतर ग्रामस्थांनी रस्त्याच्या बांधकामाच्या चौकशीची मागणी केली. ग्रामस्थांची बैठक झाली. त्यांनी झालेल्या प्रकाराची माहिती डीएम उमेश मिश्रा यांना दिली. मिश्रा यांनी आमदारांकडून माहिती घेत पीडब्ल्यूडीच्या नेतृत्त्वाखाली एक समिती स्थापन केली. या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन मिश्रा यांनी दिलं.