बिजू जनता दलामुळे एनडीएचे ‘हरी’ जिंकले!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 05:02 AM2018-08-10T05:02:36+5:302018-08-10T05:03:59+5:30
राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या बहुचर्चित निवडणुकीत बिजू जनता दलाच्या दहा मतांमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार हरिवंश सिंह यांचा २० मतांनी विजय झाला.
- सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या बहुचर्चित निवडणुकीत बिजू जनता दलाच्या दहा मतांमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार हरिवंश सिंह यांचा २० मतांनी विजय झाला. हरिवंश सिंह यांना १२५ तर विरोधकांचे संयुक्त उमेदवार बी.के. हरिप्रसाद यांना १0५ मते मिळाली. निवडणूक जिंकण्यासाठी ११९ मतांची आवश्यकता होती.
या निवडणुकीत काही तांत्रिक कारणांमुळे दोनदा मतदान झाले. पहिल्यांदा हरिवंश सिंहांना ११५ मते मिळाली; तर दुसऱ्यांदा मतदान झाल्यावर त्यांच्या मतांची बेरीज १२५वर गेली. हरिवंश सिंह यांना भाजपा व जद (यू) खेरीज अद्रमुक, शिवसेना, अकाली दल, टीआरएस व
बीजेडीने साथ दिली.
या निवडणुकीत बीजेडीने किंगमेकरची भूमिका बजावली. याखेरीज काँग्रेसचे ३, समाजवादी ३, तृणमूल १, द्रमुकचे २ सदस्य अनुपस्थित राहिल्याने विरोधकांची मते कमी झाली. वायएसआर काँग्रेसचे २ सदस्य मतदानात तटस्थ राहिले. याखेरीज पीडीपीने व ‘आप’ने हरिप्रसाद यांना मतदान न करता मतदानावरच बहिष्कार टाकला.
>चढउतार पाहावेच लागतात - सोनिया
यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या, ‘विजयी उमेदवार हरिवंश यांचे अभिनंदन. कधी आम्ही जिंकतो तर कधी आमचा पराभव होतो, राजकारणात असे चढउतार पाहावेच लागतात.’
>सभागृह हरी कृपेवर : मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘हरिवंश मूळचे बलियातले आहेत. आॅगस्ट क्रांतीत बलियाचा मोठा सहभाग होता. निवडणुकीत दोन्ही बाजूला हरी होते. यापुढे हे सभागृह हरी कृपेवरच चालणार आहे.’