सेल्फीच्या नादात दुचाकी भिंतीला धडकली, तिघांचा मृत्यू; जाणून घ्या 'त्या' वेळेत नेमकं काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 23:28 IST2022-03-20T23:27:16+5:302022-03-20T23:28:01+5:30
या घटनेनंतर सिकरिया गाव सुन्न झाले आहे. ठाणेदार ऋतुराज यांनी सांगितल्यानुसार, पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात येतील.

सेल्फीच्या नादात दुचाकी भिंतीला धडकली, तिघांचा मृत्यू; जाणून घ्या 'त्या' वेळेत नेमकं काय घडलं
सेल्फी घेण्याच्या नादात दुचाकी भिंतीवर धडकल्याने चारपैकी तीन दुचाकी स्वार तरुणांचा मृत्यू झाला. तर चौथा गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला पाटणा येथे हलविण्यात आले आहे. ही घटना रविवारी नालंदा जिल्ह्यातील चांडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयल बिगहा टर्नजवळ NH-431 वर घडली.
या अपघातात सिकरिया गावातील सोनू कुमार (18), रौशन कुमार (21) आणि कल्याण बिगहा ओपी भागाच्या बराह गावातील रहिवासी चंद्रकांत कुमार (18) यांचा मृत्यू झाला. तर बेलछी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुआपर गावचा रहिवासी चंदन कुमार हा गंभीर जखमी झाला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीवरून चारही तरुण हरनौतकडे जात होते. चालत्या बाईकवर एक तरुण दुसऱ्या नाचणाऱ्या तरुणासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, भरधाव वेगामुळे दुचाकी बाबा चौहरमल मंदिराच्या भिंतीला धडकली. यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर सिकरिया गाव सुन्न झाले आहे. ठाणेदार ऋतुराज यांनी सांगितल्यानुसार, पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात येतील.