VIDEO: चूक कोणाची अन् शिक्षा कोणाला! धडक चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार १० फूट उडाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 10:25 PM2021-05-09T22:25:27+5:302021-05-09T22:29:34+5:30
स्कूटर चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव दुचाकीची काँक्रिटच्या दगडाला धडक; दुचाकीस्वार जखमी
मँगलोर: कर्नाटकातील मंगळुरूत काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. एका स्कूटर चालकाच्या चुकीची शिक्षा एका दुचाकीस्वाराला भोगावी लागली आहे. अचानक रस्त्यात येऊन थांबलेल्या स्कूटीला धडक बसू नये म्हणून दुचाकीस्वारानं प्रयत्नांची शर्थ केली. मात्र दुचाकीचा वेग जास्त असल्यानं रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानासमोर असलेल्या काँक्रिटच्या दगडाला जाऊन आदळला.
भरधाव दुचाकी क्राँकिटच्या दगडाला आदळून हवेत उडाली. त्यामुळे दुचाकीस्वार जवळपास १० फूट हवेत उडाला. या दरम्यान दुचाकीस्वाराच्या हातून दुचाकी सुटली होती. ती मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीवर पडली. त्यामुळे दुसरा दुचाकीस्वारदेखील खाली पडला. एका स्कूटर चालकामुळे हा संपूर्ण प्रकार घडला. विशेष म्हणजे त्यानं हा संपूर्ण प्रकार पाहिला. तो काही वेळ थांबला. मात्र दोघे दुचाकीस्वार रस्त्यावर पडलेले पाहताच त्यानं तिथून पळ काढला.
🚨 Horrific accident caught on camera
— Mangalore City (@MangaloreCity) May 7, 2021
A bike rider was thrown into air after his vehicle rammed into the steps of a grocery shop while trying to avoid colliding into a two-wheeler near Padavinangady in Mangalore. The 30-year-old rider succumbed to injuries at a Pvt. hospital pic.twitter.com/Myn50PQ9eS
भरधाव वेगानं क्राँकिटच्या दगडावर आदळलेल्या दुचाकीस्वाराचं नाव प्रशांत असल्याचं वृत्त स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलं आहे. त्याचं वय केवळ ३० वर्षे आहे. काही स्थानिकांनी त्याला रुग्णालयात नेलं. मँगलोरमध्ये झालेल्या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकाच्या चुकीची शिक्षा भलत्यालाच मोजावी लागल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे.