स्थापनेआधीच बॅड बँकेवर अब्जावधींचे कुकर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 09:53 AM2021-06-29T09:53:49+5:302021-06-29T09:54:12+5:30
सूत्रांनी सांगितले की, बॅड बँक कुकर्जांचा निपटारा करण्यावर भर देणार आहे की, केवळ साठवण केंद्राप्रमाणे सर्व कुकर्जे एकत्र करून साठवून ठेवणार आहे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.
नवी दिल्ली : भारतीय बँकांच्या अकार्यरत भांडवलाच्या (एनपीए) समस्येचा निपटारा करण्यासाठी स्थापन करण्यात येत असलेली भारतातील पहिली बॅड बँक जूनअखेरीस कार्यरत होत असून, या बँकेच्या डोक्यावर तब्बल २ लाख कोटी रुपये म्हणजेच २७ अब्ज डॉलरच्या कुकर्जाचा भार राहणार आहे. हा आकडा भारतीय बँकिंग व्यवस्थेतील एकूण एनपीएच्या एक चतुर्थांश आहे. नियोजित योजनेनुसार, बँकांची तणावाखालील कर्जे बॅड बँकेकडे हस्तांतरित करण्यात येतील. सर्व बँकांची कुकर्जे एकाच छताखाली येणार असल्यामुळे त्यासंबंधीची निर्णय प्रक्रिया गतिमान होईल.
सूत्रांनी सांगितले की, बॅड बँक कुकर्जांचा निपटारा करण्यावर भर देणार आहे की, केवळ साठवण केंद्राप्रमाणे सर्व कुकर्जे एकत्र करून साठवून ठेवणार आहे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. एडेलवीस ॲसेट रिझोल्यूशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजकुमार बन्सल यांनी सांगितले की, एकरकमी स्वच्छतेच्या दृष्टीने बॅड बँक उपयुक्त ठरेल. तथापि, हा कायमस्वरूपी उपाय नव्हे. कुकर्जाच्या समस्येचा निपटारा करण्यासाठी दिवाळखोरीविषयक सुधारणा आवश्यक आहेत. अल्वारेझ अँड मार्शल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल शाह यांनी सांगितले की, भारताच्या दिवाळखोरी सुधारणांची सुरुवात तर चांगली झाली होती. तथापि, आता सुधारणा मंदावल्या आहेत.