मोदींच्या शपथविधीला बिमस्टेकच्या नेत्यांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 07:21 PM2019-05-27T19:21:45+5:302019-05-27T19:49:13+5:30
30 मे रोजी संध्याकाळी होणार मोदींचा शपथविधी
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला बिमस्टेकचे नेते उपस्थित राहणार आहेत. 30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. यावेळी काही मंत्र्यांचाही शपथविधी होईल. या सोहळ्यासाठी बिमस्टेकचे (बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन) नेते उपस्थित राहणार आहेत. मोदी सरकार शेजारी राष्ट्रांसोबतचे संबंध उत्तम राखण्यास प्राधान्य देत असल्यानं बिमस्टेकच्या नेत्यांना सोहळ्यासाठी निमंत्रण केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली.
Sources: BIMSTEC leaders to attend PM Narendra Modi's oath taking ceremony on May 30. pic.twitter.com/aniD8GkcjC
— ANI (@ANI) May 27, 2019
बिमस्टेकमध्ये बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतानचा समावेश होतो. भारतदेखील बिमस्टेकचा सदस्य आहे. 'शेजारी राष्ट्रांसोबत उत्तम संबंध राखण्याचा मोदी सरकारचा हेतू आहे. त्यासाठीच बिमस्टेकच्या नेत्यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे,' अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली. किरगिझ प्रजासत्ताकचे अध्यक्ष सोरोनबे जीनबीकोव यांनादेखील या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. सोरोनबे सध्या शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष म्हणूनदेखील काम करत आहेत. याशिवाय मॉरिशनच्या पंतप्रधानांनाही सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. याच वर्षी प्रवासी भारतीय दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमालादेखील ते उपस्थित होते.
MEA: Government of India has invited the leaders of the BIMSTEC Member States for the Swearing-in ceremony on May 30. This is in line with Government's focus on its 'Neighbourhood First' policy. pic.twitter.com/588hLOMjyA
— ANI (@ANI) May 27, 2019
नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांनी सार्क देशांच्या प्रमुखांना निमंत्रण दिलं होतं. 26 मे रोजी हा शपथविधी सोहळा संपन्न झाला होता. सार्क देशाच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आल्यानं पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफदेखील मोदींच्या शपथविधीला उपस्थित होते. मात्र यंदा पाकिस्तानच्या प्रमुखांना शपथविधी सोहळ्याला निमंत्रित करण्यात आलेलं नाही. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारतीय हवाई दलानं केलेला एअर स्ट्राइक यामुळे भारत-पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल मोदींनी फोन करुन निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं होतं.