मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे 'बिम्सटेक'ला आमंत्रण, पण पाकिस्तानला नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 10:33 AM2019-05-28T10:33:27+5:302019-05-28T10:41:39+5:30
येत्या गुरुवारी (30 मे) राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएने मिळविलेल्या ऐतिहासिक विजयानंतर केंद्रात सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या गुरुवारी (30 मे) राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला बिम्सटेक (BIMSTEC ) देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आमंत्रण देण्यात आले नसल्याचे समजते.
गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क देशांना आमंत्रित केले होते. यंदा बिम्सटेक देशांच्या प्रमुखांना आमंत्रित केले आहे. बिम्सटेक देशांमध्ये बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भुतान आणि मॉरिशस या देशांचा समावेश आहे. 'प्रथम शेजार' या धोरणानुसार भारताने अन्य देशांना आमंत्रित करण्यापूर्वी आपल्या शेजारी राष्ट्रांना आमंत्रण दिले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 2014 च्या शपथविधी सोहळ्याला सार्क देशांना आमंत्रित केले होते. त्यावेळी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, यंदा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आमंत्रण देण्यात आले नाही. भारताचा पाकिस्तानकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. कारण, गेल्या काही महिन्यांपूर्वी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव मोठ्याप्रमाणात वाढला होता.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीआधी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनल्यास दोन्ही देशांमधील शांतता चर्चेची शक्यता वाढेल, अशी आशा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली होती. तसेच, या निवडणुकीत नरेंद्र मोदी निवडून आल्यानंतर इम्रान खान यांनी त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या.