बिंद्रा भारताचा ध्वजवाहक

By admin | Published: June 11, 2016 06:22 AM2016-06-11T06:22:16+5:302016-06-11T06:22:16+5:30

सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याला आगामी रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय चमूचा ध्वजवाहक म्हणून निवडण्यात आले.

Bindra Flagor of India | बिंद्रा भारताचा ध्वजवाहक

बिंद्रा भारताचा ध्वजवाहक

Next


नवी दिल्ली : आॅलिम्पिक इतिहासातील पहिला आणि आतापर्यंतचा एकमेव वैयक्तिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याला आगामी रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय चमूचा ध्वजवाहक म्हणून निवडण्यात आले. आॅलिम्पिकच्या उद्घाटन समारंभामध्ये बिंद्रा तिरंगा उंचावून भारतीय चमूचे नेतृत्त्व करेल. त्याचप्रमाणे बिंद्रा रिओ स्पर्धेत भारतीय संघाचा सदिच्छा दूतही आहे.
भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) याविषयी स्पष्ट करताना सांगितले की, २००८ साली बीजिंग आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेता बिंद्राची या मानाच्या स्पर्धेत भारताचा ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे. यंदाची स्पर्धा बिंद्राची पाचवी आॅलिम्पिक स्पर्धा आहे. याआधी २०१२ आॅलिम्पिकवेळी ध्वजवाहक म्हणून स्टार बॉक्सर विजेंदर सिंग, दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस, कुस्तीपटू सुशीलकुमारसह बिंद्राचाही विचार झाला होता. परंतु, दोनवेळा आॅलिम्पिक पदक जिंकणाऱ्या सुशीलकुमारला आयओएने हा सन्मान दिला होता.
३३ वर्षीय बिंद्रा आॅलिम्पिकमधील एकमेव वैयक्तिक सुवर्णविजेता भारतीय खेळाडू आहे. २००८ साली १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णवेध घेताना त्याने भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली होती. बिंद्राला मिळालेल्या या सन्मानाबद्दल भारतीय रायफल संघटनेने (एनआरएआय) आनंद व्यक्त केला आहे.
एनआरएआयचे अध्यक्ष रनिंदर सिंग यांनी सांगितले की, ‘‘बिंद्रा भारताचा एकमेव वैयक्तिक सुवर्ण विजेता खेळाडू आहे. तसेच आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा संघटनेच्या (आयएसएसएफ) कार्यकारी समितीमध्येही त्याचा समावेश आहे. बिंद्राला ध्वजवाहक म्हणून निवडण्याचा निर्णय चांगला असून आम्ही मनापासून या निर्णयाचे समर्थन करतो.’’ (वृत्तसंस्था)
>‘रिओ’नंतर निवृत्ती
आगामी रिओ आॅलिम्पिकमध्ये उद्घाटन समारंभात भारताचा पथक प्रमुख म्हणून निवड झालेला नेमबाज अभिनव बिंद्रा याने यंदाच्या आॅलिम्पिकनंतर मी माझ्या कारकिर्दीला पूर्णविराम देणार असल्याचे सांगत आपली निवृत्ती घोषित केली. बीजिंग आॅलिम्पिकमध्ये सुवर्णवेध घेऊन भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेल्या बिंद्राने आपली २० वर्षांची दीर्घ कारकिर्द विशेष राहिली असल्याचेही सांगितले.
यंदाच्या आॅलिम्पिकमध्ये भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा चमू सहभागी होत आहे. १० जूनपर्यंत भारताच्या एकूण ९६ खेळाडूंनी आॅलिम्पिक पात्रता मिळवली असून २०१२ सालच्या लंडन आॅलिम्पिकमध्ये भारताच्या चमूमध्ये ८३ खेळाडूंचा समावेश होता.
विशेष म्हणजे अजूनही भारतीय संघात खेळाडूंची वाढ होण्याची शक्यता असून ही संख्या १०० चा आकडा पार करण्याची दाट शक्यता आहे.
२० वर्षांपासून सुरु असलेली माझी कारकिर्द ८ आॅगस्टला संपेल, हे विशेष. आॅलिम्पिक स्पर्धेत आपल्या देशाचा ध्वजवाहक होणे कोणत्याही खेळाडूसाठी सन्मानाची बाब असते. यासाठी मला योग्य ठरवल्याबद्दल मी खूप आभारी आहे. मला विश्वास आहे की, जेव्हा आम्ही रिओ आॅलिम्पिक स्टेडियममध्ये संचालन करु तेव्हा सुमारे एक अरबहून अधिक लोकांचा आम्हाला पाठिंबा मिळेल.
- अभिनव बिंद्रा

Web Title: Bindra Flagor of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.