आयडियाची कल्पना! 'या' गावात कचऱ्यापासून तयार केली जाते वीज; मोदींनींही केलंय भरभरून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 12:23 PM2021-09-26T12:23:10+5:302021-09-26T12:25:39+5:30
Electricity from waste material : घरातला कचरा वाया जात नाही तर वीज निर्मितीसाठी मदत करत आहे. पंतप्रधान मोदींनीही या गावच्या प्रकल्पाचं कौतुक केलं आहे.
नवी दिल्ली - तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील कांजीरंगल गावात वेस्टेज (Waste Material) पासून म्हणजेच कचऱ्यापासून वीजनिर्मिती (Power Generation) केली जात आहे. ऑगस्टमध्ये मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या गावाचे कौतुक केलं होतं. एएनआयने दिलेल्या रिपोर्टनुसार,या गावात कचऱ्यापासून वीज तयार होते. घरातला कचरा वाया जात नाही तर वीज निर्मितीसाठी मदत करत आहे. पंतप्रधान मोदींनीही या गावच्या प्रकल्पाचं कौतुक केलं आहे.
तामिळनाडू राज्यातील कांजीरंगल गावात स्थानिक लोक आणि पंचायतींच्या मदतीने एनआरयूएम (NRUM) अंतर्गत उभारण्यात आलेल्या वीजनिर्मिती प्रकल्पापासून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती केली जात आहे अशी माहिती शिवगंगाचे डीसी थिरू पी मधुसूद रेड्डी यांनी दिली आहे. हॉटेल आणि घरांमधून निघणाऱ्या ओल्या आणि सुक्या कचऱ्यावर या प्लांटमध्ये प्रक्रिया करून वीज निर्मिती केली जाते. यातून निर्माण केलेल्या वीजेचा वापर हा शेतीसाठी आणि इतर कामांसाठी केला जात आहे.
कचऱ्यापासून होतेय वीजनिर्मिती
रेड्डी यांनी या प्लांटची क्षमता 2 टन आहे, सध्या दररोज 1.2/1.3 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते अशी माहिती दिली आहे. त्यामुळे यातून निर्माण होणाऱ्या वीजेतून शेतीतील वीज वापरासह शेजारील परिसरात 200 रस्त्यांवरील दिवे लावण्यात आले आहेत. इतर जिल्ह्यांमध्येही असे प्लांट उभारण्याची मागणी आता होऊ लागली आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जात असल्याने या गावातील प्रकल्पाचं आणि लोकांचं भरभरून कौतुक केलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.