राजस्थानातील शाळांत शिकविणार भगवान परशुराम यांचे जीवनचरित्र
By admin | Published: April 30, 2017 12:47 AM2017-04-30T00:47:00+5:302017-04-30T00:47:00+5:30
भगवान परशुराम यांच्यावरील धडा शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यासह त्यांच्यावरील पुस्तके शालेय वाचनालयांना पुरविण्यात येतील
जयपूर : भगवान परशुराम यांच्यावरील धडा शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यासह त्यांच्यावरील पुस्तके शालेय वाचनालयांना पुरविण्यात येतील, असे आश्वासन राजस्थानचे शालेय शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी राजस्थानी ब्राह्मणांच्या ‘विप्र फाऊंडेशन’ला दिले.
भारतीय शिक्षण मंडळाच्या वतीने परशुराम जयंतीनिमित्त तोपदडा येथील शाळेत आयोजित कार्यक्रमात त्यांनी वरील आश्वासन दिले.
भगवान परशुराम यांच्यावरील पुस्तके शालेय वाचनालयांना पुरविण्यासाठी लागणारे पैसे आपल्या स्वेच्छानिधीतून देण्याचेही त्यांनी जाहीर केले.
युवा पिढीला भगवान परशुराम यांच्या जीवनचरित्रातून बोध घेण्याची आवश्यकता आहे. धर्माच्या रक्षणासाठी परशुराम यांनी दिलेले योगदान भारतीय संस्कृतीत अद्वितीय आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून आठव्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात त्यांच्यावरील धड्याचा समावेश असेल, असेही त्यांनी सांगितले.
रोष कमी
करण्याचा प्रयत्न
- ‘बरेच ब्राह्मण पांडित्य नसूनही नावामागे ‘पंडित’ अशी उपाधी लावून मिरवितात’, असे विधान करून देवनानी यांनी ब्राह्मण समाजाचा रोष ओढवून घेतला होता.
- आता हे आश्वासन देऊन त्यांनी ब्राह्मणांना गोंजारण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे मानले जाते.
काँग्रेसची टीका : काँग्रेसने देवनानी यांच्यावर जोरदार टीका केली. मंत्र्यांनी स्वत:च्या चुकांचे परिमार्जन करण्यासाठी सरकारी पैशाचा विनियोग करणे चुकीचे असल्याचे काँग्रेसने म्हटले.