बिप्लव देव होणार त्रिपुराचे मुख्यमंत्री, ९ मार्चला शपथविधी; मोदी यांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 01:48 AM2018-03-07T01:48:21+5:302018-03-07T01:48:21+5:30
त्रिपुरा भाजपाचे अध्यक्ष बिप्लव देव यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. बिप्लव देव त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री असतील, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले.
आगरतळा - त्रिपुरा भाजपाचे अध्यक्ष बिप्लव देव यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. बिप्लव देव त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री असतील, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले.
त्रिपुराच्या उपमुख्यमंत्रीपदी जिष्णूदेब बर्मन यांची निवड होणार आहे. निवडीनंतर बिप्लव देव यांनी सांगितले की, राज्यपाल तथागत रॉय यांची भेट घेऊन आम्ही सरकार स्थापनेचा दावा करणार आहोत. ९ मार्चला शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले आहे.
रिओना भाजपाचा पाठिंबा
नागालँडमध्ये नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक पीपल्स पार्टीचे (एनडीपीपी) नेते नैफियू रिओ हे चौथ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. रिओ यांना पाठिंब्याचे पत्र भाजपा देणार आहे, असे केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले. भाजपाचे १२ तर एनडीपीपीचे १७ आमदार निवडून आले आहेत. भाजपा-एनडीपीपी युती व नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) या दोघांनीही सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला आहे.
कॉनरॅड संगमा बनले मेघालयचे मुख्यमंत्री
शिलाँग : नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) अध्यक्ष कॉनरॅड संगमा यांनी मेघालयच्या मुख्यमंत्रीपदाची व त्यांच्या ११ सहकाºयांनी मंत्रीपदाची शपथ मंगळवारी घेतली. ते या राज्याचे १२वे मुख्यमंत्री आहेत. या सरकारमध्ये भाजपाही सहभागी झाला आहे. संगमा यांना सरकार स्थापनेसाठी ३४ जणांनी पाठिंबा दिला आहे.