चक्रीवादळ! इंडिगोचे विमान पाकिस्तानात भरकटले; भारतीय विमानांसाठी सीमा आहेत बंद, तरीही...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 03:07 PM2023-06-11T15:07:30+5:302023-06-11T15:09:50+5:30
भारत पाकिस्तान संबंधांमध्ये हे सामान्य नसले तरी पाकिस्तानने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या काही वर्षांपासून भारत-पाकिस्तानातील तणाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. युरोप, आखाती देशांत जरी जायचे असले तरी पाकिस्तानने भारतीय विमानांना त्यांच्या आकाशातून उडण्यास मनाई केलेली आहे. यामुळे ही विमाने मोठाला वळसा घालून जातात. असे असले तरी आज एक खळबळजनक घटना घडली आहे.
अमृतसरहून अहमदाबादकडे उड्डाण केलेली गो इंडिगोची फ्लाईट खराब हवामानामुळे चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेली. पार लाहोरच्या आकाशावर हे विमान घिरट्या घालू लागले होते. भारतीय विमान पाकिस्तानी हद्दीत घुसलेय हे समजताच पाकिस्तानात धावपळ उडाली होती. परंतू, नंतर ते प्रवासी विमान आहे व खराब हवामानामुळे पायलटने तिकडे नेल्याचे कळताच सारे शांत झाले.
फ्लाईट रडारनुसार शनिवारी साडे सात वाजता गो इंडिगोच्या विमानाने पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला होता. यानंतर ते पुन्हा ८.०१ वाजता भारतीय हद्दीत परतले. भारत पाकिस्तान संबंधांमध्ये हे सामान्य नसले तरी पाकिस्तानने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. खराब हवामान असेल तर अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी परवानगी असते, असे पाकिस्तानी नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाकिस्तानने देखील अनेक विमाने कमी दृष्यमानतेमुळे डायव्हर्ट केली आहेत. लाहोरसाठी हवामानाचा अंदाजाचा इशारा रात्री ११.३० वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे. शनिवारी इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळवरील व्हिजिबिलीटी ५ किमी होती.