Bipin Rawat Helicopter Crash: CDS बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात की घातपात? हवाई दलाने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 04:06 PM2022-01-05T16:06:42+5:302022-01-05T16:07:31+5:30
Bipin Rawat Helicopter Crash: देशाचे पहिले CDS बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता की, तो घातपात होता, याचं उत्तर अखेर सैन्यदलांच्या तपासामधून मिळालं आहे. सैन्यदलांकडून याबाबतची माहिती संरक्षणमंत्री Rajnath Singh यांना देण्यात आली आहे.
नवी दिल्ली - देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे ८ डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झाले होते. तसेच जनरल रावत यांच्यासोबत त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या त्यांच्या पत्नी आणि इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही या भीषण दुर्घटनेत मृत्यू झाला होता. दरम्यान, या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. दरम्यान, बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता की, तो घातपात होता, याचं उत्तर अखेर सैन्यदलांच्या तपासामधून मिळालं आहे. सैन्यदलांकडून याबाबतची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना देण्यात आली आहे.
भारतीय हवाई दलाने तिन्ही सैन्य दलांच्या तपासामधून समोर आलेल्या निष्कर्षाबाबत ४५ मिनिटांच्या प्रेझेंटेशनमधून ही माहिती दिली आहे. अधिकृतरीत्या या तपास अहवालाबाबत काही माहिती समोर आलेली नाही. मात्र प्रसारमाध्यमात येत असलेल्या रिपोर्ट्सनुसार खराब हवामानामुळे त्यादिवशी हेलिकॉप्टरला अपघात झाला होता.
८ डिसेंबर रोजी झालेल्या त्या भीषण अपघातात सीडीएस रावत आणि १३ इतर व्यक्तींचा मृत्यू झाला होता. खराब हवामान हे हेलिकॉप्टर अपघाताचे मुख्य कारण असल्याची माहिती अहवालात नमूद आहे, असे माध्यमांमधून सांगण्यात येत आहे. तपार पथकाने नमूद केल्यानुसार एमआय-१७, व्ही-५ हे हेलिकॉप्टर विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान हे चालवत होते. तसेच दुर्घटनेपूर्वी ८ मिनिटे आधी त्यांनी हेलिकॉप्टर लँड करत असल्याचा संदेश दिला होता. ते जमिनीपासून खूप कमी उंचीवरून हेलिकॉप्टर नेत होते. जमिनीपासून ५०० ते ६०० मीटर उंचावर असताना त्या दिवशी हेलिकॉप्टरच्या चारी बाजूंना ढगांचे दाट आच्छादन होते. त्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती.
रिपोर्टनुसार विंग कमांडर पृथ्वी सिंग चौहान हे रेल्वे लाइनला फॉलो करत हेलिकॉप्टर उडवत होते. तसेच त्यांना वेलिंग्टनमध्ये डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये उतरायचे होते. तिथे रावत हे लेक्चर देणार होते. अखेरचा संवाद अपघातापूर्वी ८ मिनिटे आधी रेकॉर्ड केला गेला. दरम्यान, तपास अहवालामध्ये कुठल्याही प्रकारची गडबड किंवा नुकसानीची शक्यता नाकारण्यात आली आहे, असेही माध्यमांमधून सांगण्यात येत आहे.
सरकारी सूत्रांनी एएनआयला सांगितले की, भारतीय हवाई दलाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना ४५ मिनिटांपर्यंत रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या दुर्घटनेबाबत प्रेझेंटेशन दिले आहे. तिन्ही सैन्यदलांच्या तपास अहवालामध्ये अपघाताचे कारण नमूद करतानाच भविष्यात व्हीआयपींना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरबाबत काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. तपास पथकाने सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरबाबतच्या एसओपीमध्ये बदल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सूत्रांनी एएनआयला सांगितले की, त्या दिवशी एमआय-१७व्ही५ हेलिकॉप्टर पर्वतावरून एक रेल्वे ट्रॅक पाहत पुढे जात होते. त्याचदरम्यान ढगांच्या दाट आवरणात येऊन या हेलिकॉप्टरचा अपघात झाला.