याआधी तीनवेळा झालाय Mi-17V5 हेलिकॉप्टरला अपघात; कधी अन् कुठे? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 04:35 PM2021-12-08T16:35:26+5:302021-12-08T16:43:14+5:30
लष्कराच्या हेलिकॉप्टरला तमिळनाडूमध्ये अपघात झाला आहे. कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान MI-17V5 हेलिकॉप्टर कोसळलं.
लष्कराच्या हेलिकॉप्टरला तमिळनाडूमध्ये अपघात झाला आहे. कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान MI-17V5 हेलिकॉप्टर कोसळलं. या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत प्रवास करत होते. हेलिकॉप्टर जंगल परिसरात कोसळलं. त्यानंतर हेलिकॉप्टरनं पेट घेतला. या घटनेच्या चौकशीचे आदेश लष्कराकडून देण्यात आले आहेत.
सीडीएस बिपिन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली. त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. अपघात झाला त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये १४ जण होते. बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत त्यांच्यासोबत होत्या. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची आणि तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पीटीआयनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.
The IAF Mi-17V5 helicopter was airborne from Sulur for Wellington. There were 14 persons on board, including the crew: Indian Air Force https://t.co/gmpEuHF1zw
— ANI (@ANI) December 8, 2021
लष्कर वापरत असलेलं MI-17V5 हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित मानलं जातं. रशियन बनावटीच्या या चॉपरमध्ये दोन इंजिन असतात. व्हिआयपींच्या प्रवासासाठी या विमानाचा वापर केला जातो. भारताप्रमाणेच जगभरातील अनेक देश - इराण, म्यानमार, इराकसह अगदी अमेरिकेनंही Mi-17 गटातील हेलिकॉप्टर्सचा वापर केला आहे. भारतात गेल्या काही वर्षांत या गटातील हेलिकॉप्टर्सना झालेले अपघातही चर्चेत आले होते.
बीबीसी मराठीच्या वृत्तानूसार, २५ जून २०१३ रोजी उत्तराखंडमध्ये आलेल्या पुरानंतर मदतकार्यात सहभागी झालेल्या Mi-17V-5 हेलिकॉप्टरला अपघात झाला होता, तेव्हा त्यावरील २० जणांचा मृत्यू झाला होता. तसेच ६ ऑक्टोबर २०१७मध्ये अरुणाचल प्रदेशात Mi-17 V5 हेलिकॉप्टरच्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला होता.
३ एप्रिल २०१८ रोजी Mi-17 V5 हेलिकॉप्टरचं केदारनाथमध्ये क्रॅश लँडिंग करावं लागलं होतं, त्यात काही जणांना किरकोळ दुखापती झाल्या होत्या. भारतीय हवाई दलानं एप्रिल २०१९मध्ये Mi-17V-5 हेलिकॉप्टर्सच्या रिपेअरिंग आणि देखरेखीसाठी चंदीगडमध्ये एक केंद्रही स्थापन केलं होतं.
दरम्यान प्राथमिक माहितीनुसार, बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंगटन इथे एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही सोबत होते. वेलिंगटनमध्ये आर्मीचं कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये सीडीएस बिपीन रावत यांचं लेक्चर नियोजित होतं. ऊटी कुन्नूरजवळ निलगिरी जंगल हे अतिशय घनदाट जंगल आहे. या जंगलात हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर परिसरात आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन राज्यांची सीमा निलगिरी जंगलालगत आहेत.
हवाई दलाचं हेलिकॉप्टर कोसळलं अन् होत्याचं नव्हतं झालं; पाहा थरकाप उडवणारे फोटो https://t.co/y7ZhLW83Nn#Ooty#bipinrawat
— Lokmat (@lokmat) December 8, 2021