...तर त्यांची नखं तोडून टाकेन; विप्लव देव यांची जीभ पुन्हा घसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 04:46 PM2018-05-01T16:46:01+5:302018-05-01T17:51:33+5:30
एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानं केल्यानं वाचाळवीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विप्लव देव यांचा नवा व्हिडीओ व्हायरल झालाय.
नवी दिल्लीः महाभारत काळातही इंटरनेट आणि उपग्रह होते, असा चमत्कारिक दावा करून चर्चेत आलेले आणि नंतर एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानं करणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांची जीभ पुन्हा घसरली आहे.
'सकाळी ८ वाजता भाजी विक्रेता बाजारात दुधी घेऊन येतो आणि ९ वाजेपर्यंत त्यांची पार वाट लागते. कारण, येणारा प्रत्येक ग्राहक या दुधीला नखं लावत असतो. मी असं होऊ देणार नाही. माझ्या सरकारला कुणीही हात लावू शकत नाही. त्यात कुणी नाक खुपसलं, हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला तर मी त्यांची नखंच तोडून टाकेन', असं विधान करून विप्लव देव यांनी पुन्हा नवा वाद ओढवून घेतलाय. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विप्लव देव यांचा हा वाचाळपणा भाजपासाठी डोकेदुखी ठरणारा असल्यानं, पक्षनेतृत्व त्यांच्याबाबत काय भूमिका घेतं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
त्रिपुरामध्ये भाजपानं ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर, तरुण-तडफदार विप्लव देव यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली होती. त्यांच्याकडून सगळ्यांच्याच अपेक्षा उंचावल्या असताना, एका भलत्याच विधानामुळे ते प्रकाशझोतात आले. महाभारत काळातही इंटरनेट आणि सॅटेलाइट अस्तित्वात होतं, असं अजब तर्कट त्यांनी मांडलं होतं. त्यावरून सुरू झालेली शाब्दिक चकमक थांबते न थांबते, तोच मिस युनिव्हर्स डायना हेडन हिचं जिंकणं फिक्सिंग होतं, असा दावा त्यांनी केला. त्यावरूनही खल झाला. पण, विप्लव देव स्वस्थ बसले नाहीत. तरुणांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा पान टपऱ्या उघडाव्यात, गायी पाळाव्यात, असा विचित्र सल्ला देऊन ते पुन्हा टीकेचे धनी ठरले होते. हे कमी म्हणून की काय, आता त्यांनी नखं तोडण्याची धमकी दिली आहे. ती नेमकी कुणासाठी आहे, यावरून उलटसुलट तर्कवितर्क लढवले जाताहेत.
दरम्यान, विप्लव यांच्या वाचाळपणाची दखल घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना 'समन्स' धाडल्याची चर्चा होती. परंतु, अजून तरी त्यांची भेट झालेली नाही.