त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांचा राजीनामा; अमित शाहांच्या भेटीनंतर वेगवान राजकीय घडामोडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 04:39 PM2022-05-14T16:39:11+5:302022-05-14T18:23:35+5:30
नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी भाजपमध्ये बैठकांचं सत्र सुरू
नवी दिल्ली: त्रिपुराच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. बिप्लब देव यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. भाजप नेतृत्त्वाकडून देव यांना पदावरून दूर होण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर देव यांनी त्यांचा राजीनामा राज्यपालांना पाठवला. आता त्यांची जागा कोण घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याआधी देव यांनी दिल्लीत येऊन गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली होती.
Tripura Chief Minister Biplab Kumar Deb resigns.
— ANI (@ANI) May 14, 2022
(File pic) pic.twitter.com/1WqdEiQqYC
माझ्यासाठी पक्ष सर्वात महत्त्वाचा असल्याचं देव यांनी राजीनाम्यानंतर म्हटलं. पक्ष माझ्यासाठी सर्वोच्च आहे. संघटनेच्या हितार्थ मी राजीनामा दिला आहे. पक्षाकडून जी जबाबदारी दिली जाईल, ती मी सांभाळेन, असं देव म्हणाले. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संवाद झाल्याचं त्यांनी सांगितलं.
थोड्याच वेळात भाजपच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्या बैठकीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि पक्षाचे जनरल सेक्रेटरी विनोद तावडे उपस्थित असतील. या दोघांची निवड केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून करण्यात आली आहे. दोघेही अगरताळ्याला पोहोचले आहेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांची निवड केली जाईल.