‘बिपोरजॉय’चा तडाखा सुरूच, राजस्थानमध्ये रुग्णालयांत घुसले पाणी; चार जिल्ह्यांना पुराचा वेढा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 06:44 AM2023-06-20T06:44:24+5:302023-06-20T06:44:42+5:30

अडकलेल्या ३० जणांची सुटका करण्यात यश आले आहे.

'Biporjoy' blast continues, water enters hospitals in Rajasthan; Floods engulfed four districts | ‘बिपोरजॉय’चा तडाखा सुरूच, राजस्थानमध्ये रुग्णालयांत घुसले पाणी; चार जिल्ह्यांना पुराचा वेढा

‘बिपोरजॉय’चा तडाखा सुरूच, राजस्थानमध्ये रुग्णालयांत घुसले पाणी; चार जिल्ह्यांना पुराचा वेढा

googlenewsNext

जयपूर : बिपोरजॉय वादळामुळे राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. जयपूर हवामान केंद्राने सोमवारी सवाई माधोपूर, बुंदी जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्याचवेळी कोटा, करौली, बारन, भिलवाडा आणि टोंकसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. एकूण ४ जिल्ह्यांना पुराने वेढा घातला आहे. अडकलेल्या ३० जणांची सुटका करण्यात यश आले आहे.

पावसामुळे अजमेरमधील सरकारी रुग्णालय जलमय झाले. १८ रुग्णांना दुसऱ्या वॉर्डात हलवावे लागले. गेल्या २४ तासांत राज्यात अनेक ठिकाणी ३०० मिमी म्हणजेच १२ इंच पावसाची नोंद झाली. पाली, जालोर, बारमेर आणि सिरोहीमध्ये पूरस्थिती आहे. राज्यात पूर आणि पावसामुळे आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

हवामान विभागानुसार, १९ आणि २० जून रोजी ‘बिपोरजॉय’चा प्रभाव भरतपूर, कोटा विभागात असेल. चक्रीवादळ कमकुवत होत कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होईल. त्यामुळे बुधवारपर्यंत त्याचा प्रभाव कमी होईल, असे मानले जात आहे.  चक्रीवादळ सध्या ताशी १० किमी वेगाने उत्तर-पूर्व दिशेकडे सरकत आहे.

आसाममधील पूरस्थिती; ३३४०० लोकांना फटका
पूरस्थितीला सामोरे जात असलेल्या आसामच्या अनेक भागांत रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे परिस्थिती बिकट 
बनली आहे. शेतजमिनीसह खेडी व शहरे जलमय झाली आहेत. आसाममधील पूरस्थितीचा ३३४०० लोकांना फटका बसला आहे. चिंतेत भर घालणारी बाब म्हणजे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) आसामसाठी अतिसतर्कतेचा इशारा जारी केला 
असून, गुरुवारपर्यंत राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

हजारो लाेकांना हलवले
चक्रीवादळामुळे जालोरमध्ये सर्वाधिक १८ इंच पाऊस झाला. तसेच अहोर येथे ४७१ मिमी, भीनमाळ २१७, राणीवाडा ३२२, चितळवण ३३८, सांचोरे २९६, जसवंतपुरा ३३२, बगोडा ३१० आणि सायला येथे ४११ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जालोर येथील परिस्थिती अनियंत्रित झाली. एनडीआरएफ-एसडीआरएफच्या मदतीने हजारो लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले.

हरयाणात चक्रीवादळाचा प्रवेश
चंडीगड : राजस्थान, गुजरातनंतर बिपोरजॉय हरयाणात दाखल झाले आहे. चक्रीवादळामुळे रविवारी रात्री उशिरा वातावरणात बदल झाला. त्यानंतर ताशी ६० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहू लागले, परंतु कोणतेही नुकसान झाले नाही. 

हिमाचलवर वादळाचा प्रभाव 
शिमला : बिपोरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव हिमाचल प्रदेशात दिसू लागला आहे. सिमला हवामान केंद्राने सोलन, शिमला, सिरमौर, मंडी आणि बिलासपूर या पाच जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या २४ तासांत पालमपूरमध्ये सर्वाधिक ५७ मिमी आणि धरमशाला ४४ मिमी पाऊस झाला.

    गुजरातमध्ये...
 २४ तासांपासून उत्तर मुसळधार पाउस सुरू
 २० गाई पाण्यात वाहून गेल्याने मृत्युमुखी पडल्या
 २४ तासांत १२६ मिमी पाउस  बनासकांठामध्ये झाला.

    राजस्थानमध्ये...
रुग्णालयांमध्ये पाणी शिरले
पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला
३० लोकांना सुरक्षित बाहेर काढले

Web Title: 'Biporjoy' blast continues, water enters hospitals in Rajasthan; Floods engulfed four districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.