वादळाचा तडाखा; गुजरात अस्ताव्यस्त! कच्छ, सौराष्ट्र भागांत मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2023 05:57 AM2023-06-17T05:57:44+5:302023-06-17T05:58:21+5:30
चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे राजस्थानातही मुसळधार पाऊस
अहमदाबाद: चक्रीवादळ बिपोरजॉयमुळे गुजरातच्या कच्छ आणि सौराष्ट्र भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुमारे एक हजार गावांतील वीजपुरवठा खंडित झाला असून, पाच हजारांवर विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाशी संबंधित घटनांमुळे किमान २३ लोक जखमी झाले आहेत. सुदैवाने या वादळात जीवितहानी झाली नाही.
मुसळधार पाऊस आणि समुद्राच्या पाण्यामुळे किनारपट्टीवरील अनेक गावांत पूर आल्याने तारांबळ उडाली. तथापि, या वादळाचा जोर आता कमी झाला आहे. चक्रीवादळ बिपोरजॉय (बिपोरजॉय म्हणजे बंगालीमध्ये आपत्ती) हे अत्यंत तीव्र चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जखाऊजवळ सौराष्ट्र-कच्छ किनारपट्टीवर धडकले. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १४० किमी होता.
राज्याचे मदत विभागाचे आयुक्त आलोककुमार पांडे यांनी पत्रकारांना सांगितले की, वादळाने एकूण ५८१ झाडे उन्मळून पडली. नऊ पक्की आणि २० कच्ची घरे कोसळली. दोन पक्की आणि ४७४ कच्च्या घरांचे अंशत: नुकसान झाले. कच्छ जिल्ह्यातील स्वामिनारायण मंदिराच्या छताचे छप्पर असे कोसळून पडले.
लाखाहून अधिक जणांना हलविले
- चक्रीवादळाच्या तडाख्यापूर्वी एक लाखाहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
- खाद्यपदार्थांची २५ हजार पाकिटे तयार ठेवली आहेत. राज्याच्या इतिहासातील अशा प्रकारच्या सर्वांत मोठ्या ऑपरेशनपैकी हे एक आहे.
- कच्छ, देवभूमी द्वारका, जामनगर, भावनगर, बनासकांठा आणि मोरबी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला.
राजस्थानात ‘रेड अलर्ट’
जयपूर : बिपोरजॉय चक्रीवादळाने गुजरातमध्ये तडाखा दिल्यानंतर, आता हे चक्रीवादळ वाळवंटी राजस्थानकडे सरकले आहे. राजस्थानमधील जालोर आणि बारमेर जिल्ह्यांतील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला.