‘बिपोरजॉय’ धडकले; गुजरातेत हाहाकार, एक लाख नागरिकांना हलवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 06:05 AM2023-06-16T06:05:41+5:302023-06-16T06:06:03+5:30
त्यावेळी ताशी १८५ किलाेमीटर वेगाने वारा हाेता
अहमदाबाद/नवी दिल्ली: अखेर चक्रीवादळ ‘बिपाेरजॉय’ गुरुवारी सायंकाळी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जाखो बंदरावर धडकले. ‘लँडफॉल’च्या सुरुवातीच्या प्रक्रियेनंतर त्याने वेग घ्यायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, मालमत्तेचेही प्रचंड नुकसान झाले. चक्रीवादळाचा वेग सुरुवातीला ११४-१२५ किमी प्रतितास होता आणि तो पुढे वाढत जाऊन १४०पेक्षा जास्त होईल. आठ किनारी जिल्ह्यांमधून सुमारे एक लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
‘बिपाेरजाॅय’ राजस्थानच्या दिशेने जाणार असल्याने राजस्थान प्रशासनानेही तयारी केली आहे. बिपाेरजाॅय हे जमिनीवर धडकण्यापूर्वी समुद्रात सर्वाधिक १० दिवस घाेंघावणारे चक्रीवादळ ठरले आहे. यापूर्वी १९७५ मध्ये आलेले चक्रीवादळ ९ दिवस समुद्रात हाेते. त्यावेळी ताशी १८५ किलाेमीटर वेगाने वारा हाेता. तब्बल १० दिवस समुद्रावर घाेंघावल्यानंतर ‘बिपाेरजाॅय’ चक्रीवादळ गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले. कच्छ भागातील मांडवी येथे ताशी १२५ ते १४० किमी वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पावसाने तडाखा दिला.
बचाव पथके तैनात
गुजरातमध्ये एनडीआरएफच्या १५ आणि एसडीआरएफच्या १२ तुकड्या तैनात आहेत. याशिवाय सैन्य दल, हवाई दल आणि नौदलाचे जवान बचावकार्यासाठी सज्ज होते.
लष्करही सज्ज
लष्कराने भूज, जामनगर, गांधीधाम तसेच नलिया, द्वारका आणि मांडवी येथे २७ मदत तुकड्या तयार ठेवल्या आहेत. हवाई दलाने वडोदरा, अहमदाबाद आणि दिल्ली येथे प्रत्येकी एक हेलिकॉप्टर तयार ठेवले आहे. नौदलाने बचाव आणि मदतीसाठी पाणबुडे आणि चांगले जलतरणपटू तैनात केले आहेत.
पाकमध्ये ६७,००० नागरिकांना हलवले
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या किनारपट्टी भागात बिपोरजॉयच्या धक्क्यापूर्वी सिंध प्रांतातील सुमारे ६७,००० लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.