बीरभूम : ७० जणांनी बेदम मारहाण करून घरे पेटविली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 11:52 AM2022-03-27T11:52:18+5:302022-03-27T11:52:42+5:30
सीबीआयकडून गुन्हे, २१ जणांवर आराेप
काेलकाता : पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी धक्कादायक माहिती समाेर आली आहे. सुमारे ७० ते ८० जणांच्या जमावाने ८ जणांना बेदम मारहाण करून घरांमध्ये बंद केले आणि घरे पेटविल्याची माहिती सीबीआयने दिली आहे. याप्रकरणी सीबीआयने २१ जणांविराेधात गुन्हे दाखल केले असून, त्यात बहुतांश आराेपी हे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत.
बीरभूमच्या बाेगतुई गावात ८ जणांना जिवंत जाळण्यात आले हाेते. न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयच्या पथकाने घटनास्थळी जाऊन मृतदेह आढळलेल्या घराची तपासणी केली हाेती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही पथकाने आजूबाजूच्या परिसराची पाहणी करून काही जणांची चाैकशी केली. याप्रकरणाचे संसदेतही पडसाद उमटले. हिंसाचाराची सीबीआयमार्फत चाैकशी करण्याचे आदेश काेलकाता उच्च न्यायालयाने दिले हाेते.
मृतांना जाळण्यापूर्वी केली हाेती मारहाण
फाॅरेन्सिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार ८ जणांना जिवंत जाळण्यापूर्वी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली हाेती. जळालेल्या घरांमध्ये रक्ताचे डाग आढळले आहेत. तसेच मृतदेहांवर मारहाण आणि धारदार शस्त्रांनी वार केल्याच्या जखमा दिसून आल्या. आग लावण्यासाठी पेट्राेल बाॅम्बचा वापर करण्यात आला हाेता.