"हे बंगाल आहे, उत्तर प्रदेश नाही", बीरभूम हिंसाचार प्रकरणी ममतांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 02:54 PM2022-03-23T14:54:29+5:302022-03-23T14:55:01+5:30
Birbhum Violence Case: 'सरकार आमचे आहे आणि आम्हाला आमच्या राज्यातील जनतेची काळजी आहे', असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाटमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने अहवाल मागवला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनीही राज्यातील ममता सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, काहींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर काहींनी पश्चिम बंगालमध्ये कलम 355 लागू करण्याची मागणी करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विनंती केली आहे.दरम्यान, विरोधकांच्या हल्ल्याला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
'सरकार आमचे आहे आणि आम्हाला आमच्या राज्यातील जनतेची काळजी आहे', असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "कोणत्याही नागरिकाला त्रास होऊ नये अशी आमची इच्छा आहे. बीरभूम, रामपुरहाट घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मी तात्काळ ओसी, एसडीपीओ यांना हटवले आहे आणि मी स्वतः उद्या रामपूरहाटला जाणार आहे. मी बीरभूम हत्याकांडाचे समर्थन करत नाही, पण अशा घटना यूपी, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्ये अधिक आहेत आणि हे बंगाल आहे, उत्तर प्रदेश नाही. या घटनेचे राजकारण करूनही हिंसाचारात सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर कारवाई केली जाईल."
The government is ours, we are concerned about people in our state. We would never want anyone to suffer. The Birbhum, Rampurhat incident is unfortunate. I have immediately dismissed the OC, SDPO. I will go to Rampurhat tomorrow: West Bengal CM Mamata Banerjee on Birbhum incident pic.twitter.com/xZuwsMLAW8
— ANI (@ANI) March 23, 2022
राज्यात कलम 355 लागू केले पाहिजे - अधीर रंजन चौधरी
दरम्यान, बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाटमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पश्चिम बंगालमध्ये कलम 355 लागू करण्याची विनंती केली होती. ते म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. तेथील लोक भीतीने जगत असून त्यांच्या सुरक्षेसाठी राज्यात कलम 355 लागू केले पाहिजे.
भाजपचा ममता सरकारवर हल्लाबोल
हिंसाचाराच्या या प्रकरणावरून भाजपने ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या पाच खासदारांचे पथक आज घटनास्थळी पोहोचणार आहे. पश्चिम बंगालचे भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी कोलकाता येथे सांगितले की, "संपूर्ण राज्याची स्थिती अत्यंत नाजूक आहे. गेल्या एका आठवड्यात राज्याच्या विविध भागात 26 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. कायदा आणि पश्चिम बंगालमध्ये सुव्यवस्था बिघडली आहे.