प्रसिद्ध कवयित्री अमृता प्रीतम यांची जयंती
By Admin | Published: August 31, 2016 11:58 AM2016-08-31T11:58:14+5:302016-08-31T11:58:14+5:30
पंजाबी व हिंदीतील प्रसिद्ध कवयत्री अमृता प्रीतम यांची आज (३१ ऑगस्ट) जयंती
संजीव वेलणकर
पुणे, दि. ३१ - पंजाबी व हिंदीतील प्रसिद्ध कवयत्री अमृता प्रीतम यांची आज (३१ ऑगस्ट) जयंती. १९१९ साली त्यांचा जन्म झाला.
अमृता प्रीतम यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी महत्त्वपूर्ण साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. त्यांना १९५७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९५८ मध्ये पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा पुरस्कार, १९८८ मध्ये बल्गेरियामधील वैरोव पुरस्कार आणि १९८२ मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोळाव्या वर्षी पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले अन सोळाव्या वर्षीच प्रीतमसिंहांशी विवाह झाला, पुढे साहीरवर त्यांचे उत्कट प्रेम जडले जे अखेरच्या श्वासापर्यंत टिकून होते. साहिरबद्दल लिहिताना अमृता प्रीतम एके ठिकाणी म्हणतात- "साहिर आणि माझ्यात नि:शब्दतेचं एक अनोखं नातं होतं. त्यात शारीरिक ओढीचा अंश नव्हता. मला ‘आखरी खत’साठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचं जाहीर झाल्यावर एका प्रेस रिपोर्टरनं मी लिहीत असतानाचा फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे तो फोटो काढून निघून गेल्यावर मी त्या कागदाकडे पाहिलं, तर त्यावर ‘साहिर.. साहिर.. साहिर’ हा एकच शब्द मी अनेकदा लिहिला होता. माझ्या त्या वेडेपणाचं माझं मलाच आश्चर्य वाटलं. दुसऱ्या दिवशी तो फोटो प्रसिद्ध झाला. पण तो कागद कोरा असल्यासारखा भासत होता. साहिर आणि माझ्यातलं नातं तेव्हाही नि:शब्दच होतं. आणि अखेपर्यंत ते तसंच नि:शब्द राहिलं. अमृता प्रीतम रात्रीच्या निरव शांततेत आपलं लेखन करायच्या, कुठलाही गोंगाट - आवाज नसताना त्यांची लेखणी प्रसवत असे. अमृता रात्रीतून तासंतास लेखन करत राहायच्या. अमृता प्रीतम यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. आपलं आयुष्य आपल्या विचारांनुसार जगणार्या अमृता कर्तव्यसन्मुख राहिल्या, त्या मुक्त होत्या. मा.अमृता प्रीतम यांचे ३१ आक्टोबर २००५ रोजी निधन झाले.
लोकमत समूहाकडून अमृता प्रीतम यांना आदरांजली.
संदर्भ - इंटरनेट