गुड न्यूज! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतात 69,944 बालकांचा जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 08:15 AM2019-01-02T08:15:15+5:302019-01-02T09:46:40+5:30
भारतात नववर्षाच्या पहिल्या दिवशी 69,944 बालकांनी जन्म घेतला असून हा आकडा जगात सर्वाधिक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंडने (युनिसेफ) एका अहवालात याबाबत माहिती दिली आहे.
नवी दिल्ली - सरत्या वर्षाला निरोप देत मोठ्या उत्साहात जगभरात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. भारतात नववर्षाच्या पहिल्या दिवशी 69,944 बालकांनी जन्म घेतला असून हा आकडा जगात सर्वाधिक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंडने (युनिसेफ) एका अहवालात याबाबत माहिती दिली आहे. भारतापाठोपाठ चीनमध्ये 1 जानेवारी रोजी 44,940 बालक जन्माला आले आहेत. तर नायजेरियामध्ये 25,685 बालकांनी जन्म घेतला असल्याचे युनिसेफच्या अहवालात म्हटले आहे.
2019 मध्ये युनिसेफच्या बालहक्क करार स्वीकाराचा तिसावा वर्धापनदिन आहे. वर्धापनदिनाच्या निमित्ताने युनिसेफच्यावतीने जगभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहेत. या कराराअंतर्गत प्रत्येक मुलाला चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध असेल.
युनिसेफच्या कार्यकारी उपसंचालक पेट्री गॉर्निझ्का यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण प्रत्येक मुलाला जन्मानंतर जगण्याचा हक्क बहाल करण्याचा संकल्प करायला हवा. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जगभरात एकूण 3,95,072 बालकांचा जन्म झाला. यांपैकी 98,768 मुलं ही दक्षिण आशियामध्ये जन्माला आली आहेत. पाकिस्तानमध्ये १ जानेवारी रोजी 15, 112 तर बांगलादेशमध्ये 8,428 बालकांचा जन्म झाला आहे.