'त्या' युवकांनी स्मशानभूमीत केले बर्थ डे सेलिब्रेशन, मृतदेह ठेवण्याच्या जागेवर कापला केक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 01:11 PM2017-10-20T13:11:07+5:302017-10-20T16:02:40+5:30
स्मशानभूमी अशुभ जागा समजली जाते. तिथे जाण्याची कोणचीही इच्छा नसते. पण एखाद्या परिचित व्यक्तीच्या मृत्यूनंतर आतून कितीही इच्छा नसली तरी, अंत्यसंस्काराचे विधी करण्यासाठी स्मशानात जावेच लागते.
अहमदाबाद - स्मशानभूमी अशुभ जागा समजली जाते. तिथे जाण्याची कोणचीही इच्छा नसते. पण एखाद्या परिचित व्यक्तीच्या मृत्यूनंतर आतून कितीही इच्छा नसली तरी, अंत्यसंस्काराचे विधी करण्यासाठी स्मशानात जावेच लागते. एकूणच स्मशानातल्या वातावरणामुळे तिथे जाण्याची कोणाची इच्छा नसते पण याच स्मशानभूमीत कोणी आपला वाढदिवस साजरा करत असेल तर ? टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार अहमदाबादच्या जमालपूर येथील सपतर्ही मुक्तीधाम स्माशानात गुरुवारी मध्यरात्री काही युवकांनी वाढदिवस साजरा केला.
मध्यरात्रीच्या सुमारास युवकांनी जमालपूरच्या सपतर्ही मुक्तीधाम स्माशानभूमीत बर्थ डे सेलिब्रेशन सुरु केले. एरवी सन्नाटा असलेल्या या स्मशानात युवकांच्या हसण्या-खिदळण्याचे आवाज ऐकू येत होते. कुठल्याही सैतानी शक्तीला बोलवण्यासाठी हे युवक गोंगाट करत नव्हते तर, आपला मित्र राकेश माहेरीयाला हे युवक 35 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते. राकेश वेजालपूर येथे राहतो.
मृतदेह सरणावर ठेवण्याआधी स्मशानात ज्या जागेवर ठेवला जातो तिथे त्यांनी केक ठेवून त्यावर मेणबत्त्या पेटवल्या होत्या. राकेशने केक कापल्यानंतर त्याचे मित्र तोच केक परस्परांच्या चेह-याला फासत होते. एकूणच ज्या स्मशानात दु:ख असते तिथे त्यांचा आंनदोत्सव सुरु होता.
या सेलिब्रेशनबद्दल बोलताना माहेरीयाने सांगितले की, माझ्या मित्रांनी स्मशानामध्ये वाढदिवस साजरा करायचे ठरवले. स्मशानाबद्दल समाजामध्ये मोठया प्रमाणावर अंधश्रद्धा आहेत त्या दूर होण्याच्या दृष्टीने समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल त्यासाठी स्मशानात वाढदिवसाची कल्पना मला आवडली असे राकेश माहेरीयाने सांगितले. माझा वाढदिवस फक्त सेलिब्रेशन नव्हते तर अंधश्रध्दांविरोधात तो एक संदेश होता. समाजात चांगले शिकले सवरलेले लोकही अंधश्रध्दांना खतपाणी घालतात असे राकेशने सांगितले.
प्रल्हादनगर येथे राहणा-या कल्पेश नंदुबेन (31) हीने स्मशानात वाढदिवसाची कल्पना माडंली. ती पेशाने सिव्हील इंजिनिअर आहे. मागच्यावर्षी तिने एका मित्राचा वाढदिवस स्मशानामध्ये साजरा केला होता. लोक स्वत:च्या आनंदासाठी घरी, कार्यालयात बर्थ डे साजरा करतात. पण आमच्या बर्थ डे सेलिब्रेशनमधून समाजाला एक संदेश जावा यासाठी आम्ही स्मशानभूमीची निवड केली असे कल्पेश नंदुबेनने सांगितले.