राज्यसभेत आता भाजपा सर्वात मोठा पक्ष, मात्र बहुमतापासून दूरच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 09:51 AM2017-08-04T09:51:00+5:302017-08-04T11:21:46+5:30
राज्यसभेतील काँग्रेस पक्षाच्या वर्चस्वाचा 65 वर्षांचा इतिहास भाजपाने मोडीत काढला आहे. भारतीय जनता पार्टीनं राज्यसभेत काँग्रेसला संख्याबळामध्ये मागे टाकत राज्यसभेतील सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला आहे.
नवी दिल्ली, दि.4 - राज्यसभेतील काँग्रेस पक्षाच्या वर्चस्वाचा 65 वर्षांचा इतिहास भाजपाने मोडीत काढला आहे. भारतीय जनता पार्टीनं राज्यसभेत काँग्रेसला संख्याबळामध्ये मागे टाकत राज्यसभेतील सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला आहे. राज्यसभेत भाजपाचे एकूण 58 सदस्य आहेत तर काँग्रेसचे 57 सदस्य आहेत.
मध्य प्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीनंतर राज्यसभेवर निवडून आलेले भाजपाचे खासदार सम्पतिया उइके यांनी गुरुवारी शपथ घेतली. केंद्रीय मंत्री अनिल माधव दवे यांच्या निधनानंतर या जागेवर निवडणूक घेण्यात आली. दरम्यान, उइके यांची बिनविरोध निवड झाली आहे. नरेंद्र मोदी सरकार मे 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर प्रथमच राज्यसभेत भाजपाचे सर्वाधिक खासदार आहेत. सर्वात मोठा पक्ष म्हणून जरी भाजपा समोर आला असला तरी राज्यसभेत बहुमतापासून बराच पछाडीवर आहे. दरम्यान, काँग्रेस पक्ष 2018 पर्यंत राज्यसभेतील सर्वात मोठ्या पक्षाच्या स्वरुपातच कायम राहिला असता मात्र काँग्रेसमधील दोन सदस्यांचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या सदस्यांची संख्या कमी झाली.
पुढील आठवड्यात राज्यसभेच्या 9 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यातील 6 जागा पश्चिम बंगाल तर तीन जागा गुजरातमधील आहेत. या निवडणुकीमुळे भाजपावर फारसा काही परिणाम होणार नसल्याचे म्हटले जात आहे. मात्र गुजरातमधील दोन जागा विजय मिळेल, असा विश्वास भाजपाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर तिस-या जागेवर भाजपाला काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांना जिंकू द्यायचे नाही.
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या दोन खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. मात्र पार्टी केवळ एकाच खासदाराला राज्यसभेवर पाठवू शकते. तर ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं विजय मिळवला आहे त्यावरुन त्यांचा पक्ष 5 जागांवर आरामात जिंकणार हे स्पष्ट असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भाजपाला राज्यसभेत पुढील वर्षी बराच फायदा होणार आहे. उत्तर प्रदेशातील 9 पैकी 8 जागांवर भाजपाला विजयाची अपेक्षा आहे कारण भाजपानं काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीतही मोठे यश मिळवले आहे. लोकसभेमध्ये भाजपाचे बहुमत आहे मात्र राज्यसभेत बहुमत नाही. दरम्यान, भाजपा-जेडीयू युतीचा फायदा भाजपा होण्याची शक्यता आहे. कारण जेडीयूचे 10 खासदार राज्यसभेत आहेत.