शहीद भगत सिंगचा आज जन्मदिवस, जाणून घ्या त्यांच्याबद्दल...
By Admin | Published: September 28, 2016 06:00 PM2016-09-28T18:00:22+5:302016-09-28T18:00:22+5:30
भगतसिंगांच्या जन्माच्या वेळी सरदार किशनसिंग आणि सरदार अजितसिंह यांची जेलमधून सुटका झाली, म्हणून हा मुलगा भाग्यवान आहे असे जाणून आजीने त्याचे नाव भगतसिंग
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी हसत-हसत फासावर गेलेल्या शहीद भगतसिंगचा आज जन्मदिवस आहे. भगतसिंग यांचा जन्म १९०७ च्या २८ सप्टेंबर रोजी बंगा येथे झाला. भगतसिंगांच्या जन्माच्या वेळी सरदार किशनसिंग आणि सरदार अजितसिंह यांची जेलमधून सुटका झाली, म्हणून हा मुलगा भाग्यवान आहे असे जाणून आजीने त्याचे नाव भगतसिंग ठेवले. जालियनवाला बागेचे हत्याकांड भगतसिंग यांच्या मनावर खोल परिणाम करून गेले होते. वीर सावरकरांचा प्रसिद्ध ग्रंथ 'दि इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डेन्स - १८५७' भगतसिंगांना तोंडपाठ होता. घरच्या लोकांनी लग्न ठरवल्यावर त्यांनी घर सोडले.
देशसेवेचे व्रत घेतल्यामुळे आपण लग्न करू शकत नाही असे वडिलांना कळवून त्यांनी त्यांची क्षमा मागितली. कानपूरला आल्यावर 'बलवंतसिंग' या नावाने त्यांनी अनेक लेख लिहिले. अनेक धाडसी सत्कार्यात ते सक्रिय होते. लाला लजपत राय यांचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. त्यांना मारणार्या स्कॉटचा बदला घेत असताना साँडर्स तावडीत सापडल्याने साँडर्सला उडविण्यात आले. या प्रकरणात सर्वजण फरारी झाले.
क्रांतिकारकांचे म्हणणे काय आहे हे जाहीररीत्या सर्वांना समजावे यासाठी त्यांनी एक योजना आखली. 'पब्लिक सेफ्टी' बिलाविरूद्ध देशभर संताप व्यक्त होत होता. या बिलावर सेंट्रल असेंबलीत चर्चा चालू असताना बटुकेश्वर दत्त आणि भगत सिंह यांनी असेंबलीत बाँब फेकून गोंधळ उडवून दिला. स्वतःहून अटक करून घेतली. कोर्टात आपली बाजू प्रभावीपणे मांडली. कोर्टाने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा फर्मावली. २३ मार्च १९३१ ला 'इन्कलाब झिंदाबाद' च्या घोषणा देत ते तिघेही हसत हसत फासावर चढले. फाशी देण्यात आलेला तो दिवस 'शहिद दिन' म्हणूनही ओळखला जातो.