बिर्यानी आणि १०० रुपयासाठी 'तिने' ४२ बस जाळल्या ?
By admin | Published: September 19, 2016 10:48 AM2016-09-19T10:48:03+5:302016-09-19T10:48:03+5:30
कावेरी पाणी वाटपाच्या मुद्यावरुन मागच्या आठवडयात बंगळुरुमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनात तामिळनाडूच्या ४२ बसेस जाळण्यात आल्या.
Next
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. १९ - कावेरी पाणी वाटपाच्या मुद्यावरुन मागच्या आठवडयात बंगळुरुमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनात तामिळनाडूच्या ४२ बसेस जाळण्यात आल्या. फक्त १०० रुपये आणि एक प्लेट बिर्यानीसाठी इतक्या मोठया प्रमाणावर बसेसची जाळपोळ करण्यात आल्याचा संशय आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली असून, यात सी. भाग्या नावाच्या महिलेचा समावेश आहे. भाग्यावर बसेस जाळण्यासाठी जमावाला चिथावणी दिल्याचा संशय आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी तिला फक्त १०० रुपये आणि एक प्लेट बिर्यानीचे आश्वासन देण्यात आले होते.
बस डेपोतील सीसीटीव्ही फुटेजवरुन भाग्या मुख्य चिथावणीखोर असल्याचा पोलिसांना संशय आहे. भाग्या गिरीनगरमध्ये रहाते. १२ सप्टेंबरला दुपारी ती घरी आल्यानंतर तिच्या ओळखीचे काहीजण घरी आले. त्यांनी तिला आंदोलनात सहभागी होण्यास सांगितले. त्यामोबदल्यात त्यांनी १०० रुपये आणि एक प्लेट बिर्यानी देण्याचे आश्वासन दिले असे भाग्याची आई यलम्माने सांगितले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला दिसत असली तरी, ती जाळपोळीमध्ये सक्रीय असल्याचे स्पष्ट झालेले नाही. १२ सप्टेंबरला बंगळुरुमध्ये झालेल्या हिंसाचारा प्रकरणी ४०० जणांना अटक झाली. त्यामध्ये भाग्या एकमेव महिला आहे. सध्या तिची पोलिस कसून चौकशी करत आहेत. जाळपोळ करणा-यांमध्ये भाग्याचा समावेश असला तरी ती, जमावाचे नेतृत्व करत होती हे अजून स्पष्ट झालेले नाही असे पोलिसांनी सांगितले.