बिस्मिल्ला खान यांच्या सनया नातवाने चोरल्या!
By admin | Published: January 11, 2017 04:12 AM2017-01-11T04:12:58+5:302017-01-11T04:12:58+5:30
सनईचे जादूगार भारत रत्न बिस्मिल्ला खान यांच्या महिन्यापूर्वी चोरील्या गेलेल्या चार चांदीच्या व एक लाकडी अशा एकूण पाच सनया त्यांच्या नातवानेच चोरल्याचे उघड झाले
वाराणसी : सनईचे जादूगार भारत रत्न बिस्मिल्ला खान यांच्या महिन्यापूर्वी चोरील्या गेलेल्या चार चांदीच्या व एक लाकडी अशा एकूण पाच सनया त्यांच्या नातवानेच चोरल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी या नातवाला आणि त्याच्याकडून या सनया
विकत घेणाऱ्या दोन सोनारांना अटक केली आहे.
या चोरीचा छडा लावण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित पाठक यांनी सांगितले की, बिस्मिल्ला खान यांचा नातू नझरे हसन उर्फ शदाब आणि शंकरलाल शेठ व त्यांचा मुलगा सुजित शेठ या दोन सोनारांना अटक करण्यात आली.
पाठक म्हणाले की, नझरे हसन याने चार चांदीच्या सनया चोरल्याची कबुली दिली. या सनया वितळवून तयार केलेला एक किलो चांदीचा गोळाही हस्तगत करण्यात आला. या बदल्यात सोनाराने नझरे हसन यास १७ हजार रुपये दिले होते. बिस्मिल्ला खान यांचा मुलगा काझिम हुसैन यांच्या दालमंडी भागातील घरातून ही चोरी २९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.
या पाच सनयांखेरीज खानसाहेबांना त्यांच्या चहात्यांनी दिलेली दोन सोन्याची कडी आणि इनायत खान पुरस्काराचे सन्मानचिन्हही चोरीला गेले होते. चार चांदीच्या सनया वगळून चोरीला गेलेल्या अन्य वस्तूंचा शोध घेण्यात येत आहे.
चोरून वितळविण्यात आलेल्या या चार चांदीच्या सनया बिस्मिल्ला खान यांना माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल आणि मुंबईतील एक रसिक शैलेश भागवत यांनी भेट दिलेल्या होत्या. या सनया मुख्यत्वे शोभेच्या होत्या व उस्ताद त्या कधी कार्यक्रमांत वाजविण्यासाठी नेत नसत. मात्र पाचवी लाकडी सनई त्यांची खास पसंतीची सनई होती. तिला चांदीचा कर्णा होता व मुखाजवळली तिच्यावर चांदीची नक्षीदार पट्टी बसवलेली होती. दरवर्षी बिस्मिल्ला खान मुहर्रमच्या मिरवणुकीत हिच सनई वाजवायचे.
ज्या महान कलावंताने सनईसारख्या मंगलवाद्यास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून दिगंत कीर्ति मिळवून दिली त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तीने त्यांच्या सनया चोरून त्या वितळवून टाकण्याचा नतद्रष्टेपणा करावा, याबद्दल संगीतप्रेमींमध्ये कमालीची चीड व्यक्त करण्यात येत आहे. उस्तादांच्या जन्मशताब्दी वर्षातच हे घडावे याची विशेष बोंच रसिकमनाला लागली आहे. (वृत्तसंस्था)
संग्रहालय राहून गेले
बिस्मिल्ला खान हे संपूर्ण देशाचे भूषण असल्याने सरकारने त्यांना मिळालेली सन्मानचिन्हे व त्यांच्याशी संबंधित इतर निवडक वस्तू
ताब्यात घेऊन त्यांचे संग्रहालय करावे, अशी मागणी त्यांचे कुटुंबीय गेली १० वर्षे करीत आहेत. या सनया, सोन्याची कडी व इनायत खान सन्मानचिन्ह चोरीला गेल्यानंतर कुटुंबाकडे आता ‘अब्बाजीं’चे भारत रत्न, पद्मश्री व अन्य काही पदके व सन्मानचिन्हे शिल्लक राहिली आहेत.