बिस्मिल्ला खान यांची सनई चोरीला
By admin | Published: September 11, 2014 03:08 AM2014-09-11T03:08:10+5:302014-09-11T03:08:10+5:30
दिवंगत उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या प्राणप्रिय सनईच्या ठावठिकाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ही सनई आपल्या घरातून चोरीला गेल्याचा दावा बिस्मिल्ला खान यांच्या धाकट्या चिरंजीवाने केला
वाराणसी : दिवंगत उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या प्राणप्रिय सनईच्या ठावठिकाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ही सनई आपल्या घरातून चोरीला गेल्याचा दावा बिस्मिल्ला खान यांच्या धाकट्या चिरंजीवाने केला तर थोरल्या चिरंजीवाचा हवाला देत पोलिसांनी ही सनई त्यांच्या घरी शबूत असल्याचे सांगितले.
आपल्या घराला राष्ट्रीय वारसा घोषित करण्याची मागणी करणारे एक पत्रही बिस्मिल्ला खान यांचे धाकटे चिरंजीव नाजिम हुसैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लखनौ येथील संसदीय कार्यालयाला सादर केले होते. आपला थोरला भाऊ या घराचे व्यावसायिक संकुलात रूपांतर करू इच्छित असल्याची तक्रार त्यांनी केली होती. परंतु या पत्रात सनई चोरीला गेल्याचा उल्लेखही त्यांनी केलेला नाही.
स्थानिक पोलिसांनीही सनई चोरीला गेल्याचा नाजिम यांचा दावा फेटाळून लावला. सनई घरातच आहे आणि संपत्तीच्या वादातून हा आरोप केला जात आहे, असे पोलीस म्हणाले.
सनई चोरीला गेल्याचे नाजिमचा थोरला भाऊ मेहताब याने नाकारले. एवढेच नव्हे तर ही अनमोल सनई त्याने आम्हाला दाखविली, असे चौक पोलीस ठाण्याचे प्रमुख एस. एस. ग्रोव्हर यांनी पत्रकारांना सांगितले.
सनई आपल्या घरातच ठेवलेली आहे आणि ती चोरीला गेलेली नाही, असे मेहताबने लिहूनही दिले आहे. नाजिम निराधार आरोप करीत आहे, असे ग्रोव्हर म्हणाले. (वृत्तसंस्था)