आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेविरोधात सरकारची कारवाई, जेसीबीने पाडले घर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 02:30 PM2020-07-04T14:30:00+5:302020-07-04T14:46:21+5:30
विकास दुबेने आपले घर बेकायदेशीररित्या बांधल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, प्रशासन त्याच्या सर्व मालमत्तेची चौकशी करणार आहे.
लखनऊ: कुख्यात गुंड आणि आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबे याच्याविरोधात उत्तर प्रदेश सरकारने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सरकारने जेसीबीच्या सहाय्याने शनिवारी विकास दुबे याचे घर पाडले आहे.
विकास दुबेचे घर पाडण्यासाठी अंमलबजावणी पथक आज जेसीबी मशीनसह कानपूरच्या बिकरू गावी पोहोचले. अंमलबजावणी पथकासह मोठ्या प्रमाणात पोलीस सुद्धा या कारवाई दरम्यान उपस्थित आहेत.
विकास दुबेने आपले घर बेकायदेशीररित्या बांधल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, प्रशासन त्याच्या सर्व मालमत्तेची चौकशी करणार आहे. त्याची सर्व बँक खातीही जप्त केली जाणार आहेत. तसेच, विकास दुबेचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 20 पथके विविध भागात छापा टाकत आहेत. या सर्व क्षेत्रात विकास दुबेचे कुटुंब आहे.
याप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी आतापर्यंत 12 जणांना ताब्यात घेतले आहे. जेणेकरून विकास दुबेला लवकरात लवकर पकडता येईल. विकास दुबे नेपाळमध्ये पळून जाण्याचीही शक्यता आहे, म्हणून लखीमपूर खेरी जिल्ह्यातील पोलीसही सतर्क आहेत.
लखीमपूर खेरीच्या एसपी पूनम यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, "नेपाळ सीमेवर विकास दुबेबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. नेपाळला लागून 120 किलोमीटरची सीमा आहे, त्याठिकाणी चार पोलीस ठाणे आहेत, सर्वत्र त्याचे फोटो पोस्ट केले आहेत. तसेच, एसएसबी अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. जिल्ह्याच्या सीमेवरही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून तपास सुरू आहे."
दरम्यान, गेल्या गुरुवारी रात्री कानपूरच्या बिकरू गावात गुंड विकास दुबे याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्याने आणि त्याच्या गुंडांनी अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी झालेल्या चकमकीत एक पोलीस उपअधीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल यांचा मृत्यू झाला.
आणखी बातम्या ....
नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या कॅबिनेटमध्ये? ऊर्जामंत्री होण्याची शक्यता
TikTok सारखं भारतीय Moj अॅप; अवघ्या दोन दिवसांत हजारो युजर्स