जिकडे जाईल दृष्टी, तिकडे तुफान बर्फवृष्टी; चौघांचा मृत्यू, हजारो वाहने अडकून पडली, वीजही नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 08:53 IST2024-12-25T08:53:39+5:302024-12-25T08:53:51+5:30

काश्मीर, हिमाचल प्रदेशात तडाखा; दोन दिवसांमध्ये आणखी बर्फवृष्टीचा इशारा

Bitter cold in North India has created an atmosphere of excitement among tourists | जिकडे जाईल दृष्टी, तिकडे तुफान बर्फवृष्टी; चौघांचा मृत्यू, हजारो वाहने अडकून पडली, वीजही नाही

जिकडे जाईल दृष्टी, तिकडे तुफान बर्फवृष्टी; चौघांचा मृत्यू, हजारो वाहने अडकून पडली, वीजही नाही

शिमला: उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असून, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाल्यामुळे नाताळ आणि नववर्ष साजरे करण्यासाठी त्या भागात दाखल झालेल्या पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, त्याचवेळी गेल्या २४ तासांमध्ये हिमाचल प्रदेशात झालेलया बर्फवृष्टीमुळे चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. बर्फाचा थर साचल्यामुळे ७०० पेक्षा जास्त वीजेचे रोहित्र बंद करण्यात आले आहेत. याशिवाय राष्ट्रीय महामार्गांसह ३५० पेक्षा जास्त रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे बसेससह हजारो वाहने अडकून पडली आहेत.

बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडे दाखल झालेल्या पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. शिमला येथे विंटर कार्निव्हलचे उद्घाटन करण्यात आले. देशभरातून तेथे दाखल झालेल्या पर्यटकांना त्याचा आनंद घेतला

काश्मीरमध्ये पारा शून्य अंशाखाली

काश्मीरच्या पर्वतीय क्षेत्रात मंगळवारी हिमवृष्टी झाल्याने थंडीची लाट पसरली आहे. किमान तापमान गोठणबिंदूपेक्षा काही अंशांनी खाली नोंदवल्या गेले आहे. तत्पूर्वी सोमवारी रात्री सोनमर्ग या पर्यटनस्थळासह उंचावरील भागात हिमवृष्टी झाली. तापमानात नीचांकी घट झाल्याने जल पुरवठा करणाऱ्या  पाइपलाइनमधील पाणी गोठले असून, अनेक जलाशयांच्या पृष्ठभागावर बर्फ साचला.

सोमवारी श्रीनगरमध्ये कमाल तापमान २.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सामान्यपेक्षा सहा अंशांनी कमी होते. अमरनाथ यात्रेचे आधार शिबिर पहलगाममध्ये किमान तापमान उणे ७.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

तापमान घटणार 

२६ डिसेंबरपर्यंत किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दुसरीकडे बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, हेमकुंड साहिब व कुमाऊन येथे सोमवारी हिमवृष्टी झाली. दरम्यान राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब व हरयाणाच्या बहुतांश भागात पाऊस झाला. महाराष्ट्रातही मुंबईसह अनेक शहरांमध्ये ढगाळ वातावरण होते.

राजधानी दिल्ली धुक्यात हरवली

देशाची राजधानी नवी दिल्लीत मंगळवारी सकाळी धुके पसरले होते. उत्तरेकडील थंडीच्या लाटेचा परिणाम दिल्लीतही जाणवत असून, येथीन किमान तापमान ९.९ अंश सेल्सिअस नोंदवल्या गेले. या हंगामातील सरासरी तापमानापेक्षा ते दोन अंशांनी अधिक होते. मंगळवारी दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) अत्यंत खराब श्रेणीत म्हणजे ३९८ नोंदवण्यात आला.

Web Title: Bitter cold in North India has created an atmosphere of excitement among tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.