समाजातील कटुता संपावी; संपूर्ण देशात मनाच्या अयोध्येचे पुनर्निर्माण व्हावे- डॉ. मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 08:05 AM2024-01-22T08:05:39+5:302024-01-22T08:06:41+5:30

अयोध्या या शब्दाचा अर्थ जिथे युद्ध नाही, जी कलह मुक्त जागा आहे ती नगरी, असा आहे.

Bitterness in society should end; Ayodhya of mind should be reconstructed in the whole country - Dr. Mohan Bhagwat | समाजातील कटुता संपावी; संपूर्ण देशात मनाच्या अयोध्येचे पुनर्निर्माण व्हावे- डॉ. मोहन भागवत

समाजातील कटुता संपावी; संपूर्ण देशात मनाच्या अयोध्येचे पुनर्निर्माण व्हावे- डॉ. मोहन भागवत

- डॉ. मोहन भागवत

अयोध्या या शब्दाचा अर्थ जिथे युद्ध नाही, जी कलह मुक्त जागा आहे ती नगरी, असा आहे. संपूर्ण देशामध्ये या अर्थाने मनाच्या अयोध्येचे पुनर्निर्माण होणे ही सद्यकालीन आवश्यकताही आहे व आपले सर्वांचे कर्तव्यही आहे. मध्यंतरी उत्पन्न झालेली कटुता  आता संपली पाहिजे.

ब्रिटिश परकीय सत्तेविरुद्ध १८५७ मध्ये जेव्हा युद्धाची योजना बनू लागली तेव्हा अयोध्येतील हिंदू व मुसलमानांनी एकत्र येऊन लढण्याकरिता, परस्पर विचार विनिमयातून गोहत्या बंदी आणि श्रीरामजन्मभूमी मुक्ती या मुद्द्यांवर समेट घडवून आणला. बहादूरशहा जफर यांनी गोहत्या बंदीचा आपल्या घोषणापत्रात समावेश केला होता. समाज एकत्र होऊन लढला; परंतु दुर्दैवाने तो संघर्ष अयशस्वी झाला. १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर, सर्वसंमतीने सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार झाला तेव्हाच अशा मंदिरांसंबंधी चर्चा सुरू झाली होती. श्रीरामजन्मभूमीच्या मुक्तीबाबत अशा सर्व सहमतीचा विचार करता आला असता. परंतु राजकारणाची दिशा बदलली. भेदाभेद, लांगुलचालन अशा प्रकारच्या स्वार्थी राजकारणाचे स्वरूप प्रचलित होऊ लागले, आणि त्यामुळे हा प्रश्न कायमच राहिला.

सरकारांनी या प्रश्नासंबंधी हिंदू समाजाची इच्छा व मन ध्यानात घेतले नाही. उलट समाजाकडून घेतल्या जाणाऱ्या पुढाकारास त्यांनी खीळ घालण्याचे प्रयत्न केले. अखेर मोठ्या संघर्षांनंतर ५ ऑगस्ट २०२० रोजी मंदिराचे भूमिपूजन झाले व आता पौष शुक्ल द्वादशी युगाब्द ५१२५, तद्नुसार दि. २२ जानेवारी २०२४ला श्री रामलल्लांच्या मूर्तीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून देण्यात आलेला आहे. आता या नाहक विवादापोटी उत्पन्न झालेले पक्षविपक्ष संपले पाहिजेत. मध्यंतरी उत्पन्न झालेली कटुता संपली पाहिजे. अयोध्या या शब्दाचा अर्थ जिथे युद्ध नाही, जी कलह मुक्त जागा आहे ती नगरी, असा आहे. संपूर्ण देशामध्ये या अर्थाने मनाच्या अयोध्येचे पुनर्निर्माण होणे ही सद्यकालीन आवश्यकताही आहे व आपले सर्वांचे कर्तव्यही आहे.

अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माणाचा हा प्रसंग म्हणजे राष्ट्रीय स्वाभिमानाच्या पुनर्जागरणाचे प्रतीक आहे. राष्ट्रीय पुरुषार्थाच्या विजयाचे स्मारक आहे. मंदिरातील श्रीरामांची पूजा ही ‘पत्रम् पुष्पम् फलम् तोयम्’ या परंपरागत पद्धतीने जशी होईल, तशी व त्याबरोबरच मनोमंदिरामध्ये रामदृष्टी स्थापित करून, त्या प्रकाशात आदर्श ठरणाऱ्या आचरणाकडे चालत राहूनही आपल्याला श्रीरामांची पूजा साधावी लागेल. जीवनात सत्यनिष्ठा, बल आणि पराक्रमासोबतच क्षमाशीलता, आर्जव आणि नम्रता, सर्वांशी आत्मीय व्यवहार, अंत:करणाची मृदुता व कर्तव्य पालनात स्वतःविषयी कठोरता आदी श्रीरामांच्या गुणवैशिष्ट्यांचे आचरण व्यक्तिगत जीवनात व निदान आपल्या कुटुंबीयांच्या जीवनात, आणण्याचा प्रयत्न प्रत्येकाला प्रामाणिकपणे, चिकाटीने व कसोशीने करावा लागेल. तसेच आपल्या सामाजिक जीवनात सुद्धा अनुशासन बाणवावे लागेल.

न्याय आणि करुणा, समरसता, निस्पृहता आदी श्रीराम चरित्रातून दिसून येणारी सामाजिक गुणवत्ता समाजात पुन्हा एकदा प्रचलित करणे, शोषणमुक्त, समतायुक्त, न्यायाधिष्ठित, शक्तिसंपन्न, करुणावान व विवेकसंपन्न असणारा पुरुषार्थी समाज बांधणे, ही या श्रीरामांची सामाजिक  पूजा होय. अहंकार स्वार्थ आणि भेद यांच्यामुळे अनंत प्रकारच्या आपत्ती स्वतःवर ओढवून घेऊन सर्व विनाशाच्या चिंतेमध्ये हे जग खितपत पडले आहे. त्याला सुमती, ऐक्य, उन्नती व शांतीचा मार्ग दाखवणारा जगदाभिराम भारत पुन्हा उभे करण्याच्या सर्वकल्याणकारी आणि सर्वेषाम् अविरोधी अभियानाचा प्रारंभ श्री रामलल्लांच्या श्रीराम जन्मभूमीत प्रवेशाने व प्राणप्रतिष्ठेने होणार आहे. मंदिराच्या पुनर्निर्माणाबरोबरच भारताचे व त्यायोगे संपूर्ण जगाचे पुनर्निर्माण कळसाध्यायाला पोहोचविणे, हे व्रत २२ जानेवारीच्या भक्तिमय आनंदोत्सवात संकल्पबद्ध होऊन आपण सर्वांनी पत्करावे व त्याची जाणीव मनात नित्य तेवती ठेवून पुढची वाटचाल करावी, अशी सद्य काळाची गरज आहे.    
।। जय सियाराम ।।

Web Title: Bitterness in society should end; Ayodhya of mind should be reconstructed in the whole country - Dr. Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.