पॅराग्लायडिंग करताना विचित्र अपघात, २ पर्यटकांचा मृत्यू, पॅराग्लायडर्सची हवेतच टक्कर झाली आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 08:25 IST2025-01-19T08:24:34+5:302025-01-19T08:25:39+5:30
Himachal Pradesh News: हिमाचल प्रदेमधील कांग्रा आणि कुल्लू जिल्ह्यात दिवसभरात झालेल्या दोन वेगवेगळ्या पॅराग्लायडिंग अपघातात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत पर्यटक हे गुजरात आणि तामिळनाडूमधील होते.

पॅराग्लायडिंग करताना विचित्र अपघात, २ पर्यटकांचा मृत्यू, पॅराग्लायडर्सची हवेतच टक्कर झाली आणि...
हिमाचल प्रदेमधील कांग्रा आणि कुल्लू जिल्ह्यात दिवसभरात झालेल्या दोन वेगवेगळ्या पॅराग्लायडिंग अपघातात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत पर्यटक हे गुजरात आणि तामिळनाडूमधील होते.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार धर्मशाला येथील इंद्रुनाग पॅराग्लायडिंग साइटवर शनिवारी संध्याकाळी उड्डाण करत असताना भवसार खुशी नावाची महिला खाली कोसळली. त्यात तिचा मृत्यू झाला. तसेच पायलट सुद्धा तिच्यासोबत खाली कोसळला. त्याला दुखापत झाली. त्याला उपचारांसाठी टांडा मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आलं आहे. याबाबत सर्व बाजूंनी तपास सुरू आहे, असे कांग्राचे एएसपी वीर बहादूर यांनी सांगितले.
तर दुसऱ्या एका घटनेमध्ये शुक्रवारी संध्याकाळी कुल्लू जिल्ह्यातील गार्सा लँडिंग साइटजवळ झालेल्या एका विचित्र अपघातात तामिळनाडूमधील एका २८ वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाला, तर पायलट गंभीर जखमी झाला. एक्रोबेटिक्स करत असलेला एक पॅराग्लायडर चुकून दुसऱ्या पॅराग्लायडरवर आदळला आणि त्यामधील एक जण जमिनीवर पडला. दोन्ही पॅराग्लायडर जमीनीपासून १०० फूट उंचावर असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत जयश राम याचा मृत्यू झाला. तर पायलट अश्विनी कुमार हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी पीजीआय चंडीगड येथे पाठवण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, भादंवि कलम १२५ आणि १०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.