भाजपला मोठा धक्का, जुन्या साथीदाराने साथ सोडली; BJD नेता म्हणाले, "विरोधकांसोबत..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 09:55 AM2024-06-25T09:55:05+5:302024-06-25T10:00:05+5:30
ओडिशा विधानसभेतील पराभवानंतर बीजेडीने आता संसदेतही भाजपला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. बीजेडीचे राज्यसभेत ९ खासदार आहेत.
संसदेचे अधिनेशन सुरू झाले आहे. अधिवेशनापूर्वीच भाजपाला मोठा धक्का बसला आहे. संसदेत सभापती निवडीपूर्वी विरोधकांना दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा मिळाला आहे. ओडिशा विधानसभा आणि लोकसभेतील पराभवानंतर नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाने विरोधकांना पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे. पीएम मोदींच्या मागील दोन टर्ममध्ये बीजद'ने संसदेत भाजपला पाठिंबा दिला होता. राज्यसभेतही विधेयक मंजूर करण्यासाठी संख्याबळ नसले तर बीजेडी एनडीएला पाठिंबा देत होती. मात्र, यावेळी ओडिशा निवडणुकीत भाजप आणि बीजेडीची युती होऊ शकली नाही. यानंतर विधानसभेतही भाजपने नवीन पटनायक यांचा पराभव केला.
लोकसभा अध्यक्षपदी कुणाला मिळणार संधी?; रात्री उशिरापर्यंत अमित शाहांच्या घरी बैठक
नवीन पटनायक यांनी सोमवारी भुवनेश्वरमध्ये आपल्या ९ राज्यसभा खासदारांसोबत बैठक घेतली. यानंतर पक्षाने जारी केलेल्या निवेदनात बीजेडी राज्याच्या विकासाच्या सर्व बाबी केंद्र सरकारसमोर ठेवणार असल्याचे म्हटले आहे. अनेक मागण्या आजतागायत पूर्ण झालेल्या नाहीत. आम्ही संसदेत ओडिशातील साडेचार कोटी जनतेचा आवाज बनू, असंही यावेळी म्हटले आहे. १० वर्षात बीजेडीने अनेक वेळा सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आहे. भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांनी एके दिवशी नवीन पटनायक यांना भाजप सोडल्याचा नक्कीच पश्चाताप होईल, असे म्हटले होते.
अलीकडेच बीजेडीने दिल्ली सेवा विधेयकाचा पराभव करण्यासाठी भाजपला पाठिंबा दिला होता. याशिवाय तिहेरी तलाक आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकावरही बीजेडी सरकारसोबत उभी आहे. बीजेडी आता ओडिशासाठी करत असलेल्या मागण्यांमध्ये राज्याला विशेष दर्जा, गरिबांसाठी शिक्षण आणि घरे, महामार्ग बांधणे आणि एम्स सारख्या संस्थांचे बांधकाम यांचा समावेश आहे. पक्षाने एमएसपीचा मुद्दाही उपस्थित केला आहे. याशिवाय राज्यातील १६२ समाजाचा आदिवासींच्या यादीत समावेश करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
बीजेडीचे २०१९ मध्ये १२ लोकसभा खासदार होते
ओडिशा विधानसभा निवडणुकीत यावेळी बीजेडी'ला १४७ पैकी फक्त ५१ जागा जिंकता आल्या. त्याआधी बीजेडीने ११२ जागा जिंकल्या होत्या. तर ओडिशामध्ये भाजपने ७८ जागांसह सरकार स्थापन केले आहे. नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखाली बीजेडीला ओडिशात सरकार स्थापन करता आले नसल्याची ही पहिलीच वेळ आहे. बीजेडीचे २०१९ मध्ये १२ लोकसभा खासदार होते. आता राज्यसभेत त्यांचे फक्त ९ खासदार आहेत. २०२६ मध्ये ही संख्या निम्म्यावर येईल.
बीजेडी नेते सस्मित पात्रा म्हणाले की, नवीन पटनायक यांनी राज्यातील जनतेच्या हितासाठी लढा द्यावा, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. भाजपला आता पाठिंबा मिळणार नाही. फक्त विरोधकांना पाठिंबा दिला जाईल. बीजेडी निवडणुकीत इंडिया आघाडीलाही पाठिंबा देत नव्हती. नितीश कुमार इंडिया आघाडीचे समन्वय साधत असताना त्यांनी नवीन पटनायक यांची भेट घेतली होती.