भाजपाचे पुन्हा जय श्रीराम! बहुमत मिळाल्यास उभारणार भव्य राम मंदिर
By admin | Published: January 24, 2017 09:18 PM2017-01-24T21:18:58+5:302017-01-24T21:18:58+5:30
उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी भाजपाने पुन्हा एकदा राम मंदिराचा राग आळवला आहे. उत्तर प्रदेशच्या आगामी
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी भाजपाने पुन्हा एकदा राम मंदिराचा राग आळवला आहे. उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यास अयोध्येत भव्य राम मंदिर उभारले जाईल, असे भाजपाचे उत्तर प्रदेश अध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले.
उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रचाराच्या रणधुमाळीला रंग भरत असतानाच भाजपाकडून राम मंदिराच्या मुद्याला पुन्हा एकदा हवा देण्याचा प्रयत्न झाल्याने प्रचारात हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. राम मंदिराबाबत मौर्य म्हणाले, "राम मंदिर भाजपासाठी आस्थेचा विषय आहे. दोन महिन्यांत त्यावर तोडगा निघू शकत नाही. पण मंदिराची उभारणी निवडणुकीनंतर केली जाईल, या निवडणुकीत भाजपा पूर्ण बहुमताने सत्तेत येईल आणि राम मंदिर उभारले जाईल."
यावेळी मौर्य यांनी राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर चौफेर आरोपबाजी केली. यादवांच्य़ा नेतृत्वाखाली संपूर्ण सरकारी तंत्रच भ्रष्टाचाराने बरबटल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सपा-काँग्रेस आघाडीचीही त्यांनी खिल्ली ऊडवली. सपा हे बुडते जहाज आहे, तर काँग्रेसचे जहाज आधीच बुडाले आहे, असा टोला त्यांनी लगावला.