भाजपासाठी पुन्हा ‘किशोर’नीती ? भाजपा नेत्यांच्या घेतल्या भेटीगाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:03 AM2018-02-27T01:03:33+5:302018-02-27T01:03:33+5:30
लोकसभा निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठी भाजपाला मदत करावी, यासाठी निवडणूक प्रचारतज्ज्ञ प्रशांत किशोर सक्रिय झाल्याचे वृत्त आहे.
व्यंकटेश केसरी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठी भाजपाला मदत करावी, यासाठी निवडणूक प्रचारतज्ज्ञ प्रशांत किशोर सक्रिय झाल्याचे वृत्त आहे. ते सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना मदत करीत आहेत, पण त्यांनी भाजपा नेत्यांशी संपर्क साधला होता.
गुजरातधील कसाबसा विजय, राजस्थानात पोटनिवडणुकांमध्ये पराभव आणि प्रादेशिक पक्षांनी सुरू केलेला वेगळा विचार, यामुळे भाजपा आपली मदत घेईल, असे किशोर यांना वाटत असले, तरी भाजपाने अद्याप तसा निर्णय घेतला नाही, असे कळते.
किशोर यांच्या प्रचार पद्धतीने २0१२ साली गुजरात विधानसभा निवडणुकांत व २0१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळाले होते. बिहारमध्ये जनता दल (संयुक्त), राजद व काँग्रेस यांच्या महाआघाडीला यश मिळवून देण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर, काँग्रेसने पंजाब व उत्तर प्रदेशसाठी त्यांची मदत घेतली, पण उत्तर प्रदेशात काँग्रेस अपेक्षेप्रमाणे पराभूत झाला. पंजाबच्या काँग्रेसचा यशाचे श्रेयही कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मिळाले.
महाराष्ट्रात शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे, आंध्र प्रदेशात तेलुगू देसमही तशाच विचारात असल्याचे सांगण्यात येत आहे. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, तेलंगणामध्येही भाजपाला स्वत:ची खात्री नाही. त्यामुळे उत्तर भारतातील राज्यांवरच लक्ष्य केंद्रित करून पुन्हा विजय मिळविण्याचे भाजपाचे प्रयत्न असतील. त्यासाठी प्रशांत किशोर यांची मदत घ्यायची का, हा निर्णय भाजपाने घेतलेला नाही.
मोदी, शहा यांच्याशी चर्चा?
भाजपाला गुजरातमध्ये काँग्रेसने टक्कर दिली आणि राजस्थानात सर्व पोटनिवडणुकांत भाजपाचा पराभव झाला. अशा स्थितीत निवडणूक प्रचाराची वेगळ्या पद्धतीने आखणी करण्यासाठी आपण भाजपाला मदत करू शकू, या विचारानेच प्रशांत किशोर यांनी भाजपाशी संपर्क केल्याचे कळते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रशांत किशोर ३ महिन्यांपूर्वी भेटले होते. त्यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांचीही भेट घेतली होती. त्यांना लोकसभेसाठी भाजपाचे काम करण्याची इच्छा आहे, पण भाजपाने होकार दिलेला नाही.
सोबतीला मंदिर -
प्रशांत किशोर यांचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी उत्तम संबंध आहेत. त्यामुळे नितीश कुमार यांच्यामार्फतही ते भाजपाचे काम मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत, असे कळते. मात्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरयाणामध्ये २0१४ सारखा विजय मिळविण्यासाठी अयोध्येत राम मंदिर, ट्रिपल तलाक या मुद्द्यांचा आधार घ्यायचा भाजपाने ठरविले असल्याचे आतापासून दिसू लागले आहे.