दिल्ली महापालिकांमध्ये पुन्हा भाजपा?
By admin | Published: April 24, 2017 12:48 AM2017-04-24T00:48:56+5:302017-04-24T00:48:56+5:30
दिल्लीत तीनही महापालिकेत भाजपला तिसऱ्यांदा बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. एक्झिट पोलने हा अंदाज वर्तविला आहे.
नितीन अग्रवाल / नवी दिल्ली
दिल्लीत तीनही महापालिकेत भाजपला तिसऱ्यांदा बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. एक्झिट पोलने हा अंदाज वर्तविला आहे. महापालिकेत प्रथमच नशिब आजमावत असलेल्या आम आदमी पार्टीला आणि काँग्रेसला फारशा जागा मिळणार नसल्याचा अंदाज आहे.
एबीपी सीव्होटरच्या अंंदाजानुसार, तीन महापालिकेतील २७० पैकी २१८ जागांवर भाजपला विजय मिळेल. आम आदमी पार्टीला २४ आणि काँग्रेसला २२ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बीएसपीला केवळ ८ जागा मिळतील असा अंदाज आहे. या एक्झिट पोलनुसार, भाजपला ८० जागांचा फायदा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसला ५५ आणि बीएसपीला ४९ जागांचे नुकसान होत आहे.
आज तक - एक्सिस माय इंडियाच्या अंदाजानुसार, भाजपला २०२ ते २२० जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला १९ ते ३१ जागा आणि आम आदमी पार्टीला २३ ते ३५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. ८ ते १६ जागांवर अपक्ष आणि अन्य पक्षांचे उमेदवार विजयी होतील, असा अंदाज आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईव्हीएमच्या मशिनच्या गडबडीबाबत तक्रार केली आहे. मतदान अधिकाऱ्यांनी अनेक मतदारांना मतदान करु दिले नाही, असेही यात म्हटले आहे.
दिल्ली महापालिका निवडणुकीत ५४ टक्क्यांहून अधिक मतदान
दिल्ली महापालिकेसाठी रविवारी ५४ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. राज्य निवडणूक आयुक्त एस. के. श्रीवास्तव यांनी सांगितले की, सकाळी आठ वाजता सुरू झालेले मतदान साडेपाच वाजता संपले.
श्रीवास्तव यांनी सांगितले की, दिल्लीच्या सर्वच भागांत मतदान शांततेत पार पडले. दुपारी चार वाजेपर्यंत ४५ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाची गती वाढली. गत मतदानाच्या तुलनेत यंदा अधिक मतदान झालेले असेल. हे मतदान ५४ टक्क्यांपेक्षा अधिक असू शकते.
२०१२ च्या निवडणुकीत ५४ टक्के मतदान झाले होते. चार वाजेपर्यंतच ५९ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यात सर्वाधिक २२ लाख मतदारांनी उत्तर दिल्ली महापालिकेसाठी मतदान केले. तीन महापालिकेत एकूण २७२ वॉर्ड असून २७० वॉर्डसाठी रविवारी मतदान झाले.
उमेदवारांच्या मृत्यूमुळे दोन ठिकाणचे मतदान स्थगित करण्यात आले आहे. या निवडणुकीत भाजपचे २६६, आपचे २६२ आणि काँग्रेसचे २६७ तर स्वराज इंडियाचे १०९ उमेदवार रिंगणात आहेत.