लोकसभेच्या ३५० जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य; २०२४च्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 07:16 AM2023-12-23T07:16:41+5:302023-12-23T07:16:54+5:30
२०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपच्या दोन दिवसीय मिनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या विस्तारित मुख्यालयात प्रारंभ झाला.
- संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ३५० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. गरीब, शेतकरी, युवा व महिला भाजपचे लक्ष्य पूर्ण करण्याचे काम करतील. उमेदवारांच्या नावांची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे.
२०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपच्या दोन दिवसीय मिनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या विस्तारित मुख्यालयात प्रारंभ झाला.
२०२४च्या लोकसभा निवडणुकीची तयारी, हा या बैठकीचा अजेंडा आहे. भाजपने २०२४मध्ये ३५० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या गरीब, शेतकरी, महिला व युवक या चार जणांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. मोदी यांची गॅरंटीची गाडी देशाच्या प्रत्येक गावात व शहरात फिरत आहे. ही मोहीम २६ जानेवारीपर्यंत चालणार आहे.
श्रीराम मंदिराचा मुद्दा देशभर गाजवणार
अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी भाजपने अनेक दशके लढाई लढली, संघर्ष केला व आता मंदिरही भाजपमुळेच उभारण्यात येत आहे. त्यामुळे ५०० वर्षांत जे काम कोणी करू शकले नाही, ते मोदी सरकारने केले आहे, हे सर्वसामान्य जनतेत जाऊन सांगण्यात येणार आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीतही श्रीराम मंदिर हाच निवडणुकीचा मुद्दा बनविण्यात येणार आहे.
बूथ जिंकले तर निवडणूक जिंकली
२०२४ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची सर्व भिस्त संघटन व कार्यकर्त्यांवर असेल. बूथ मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. प्रत्येक बूथ मजबूत करण्यात येणार आहे. पन्ना प्रमुख, पन्ना कमिटी तयार करण्यात येणार आहे.
लोकसभा जागेसाठी वेगवेगळी रणनीती तयार केली जात आहे. २०१९मध्ये पराभूत झालेल्या जागा यावेळी जिंकण्यासाठी आधीपासूनच तयारी सुरू आहे.