'भाजपचे सहयोगी बुडते जहाज सोडत आहेत'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 01:20 AM2019-11-18T01:20:19+5:302019-11-18T06:26:01+5:30
झामुमोच्या नेतृत्वातील विरोधी आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हेमंत सोरेन यांचा हल्लाबोल
नवी दिल्ली : झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला आघाडी करण्यासाठी अडचणी येत असताना झामुमोच्या नेतृत्वातील विरोधी आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हेमंत सोरेन यांनी म्हटले आहे की, भाजपचे सहयोगी बुडते जहाज सोडत आहेत. वारा कोणत्या दिशेने वाहत आहे, हे त्यांना ठाऊक आहे. ही लोकसभेची निवडणूक नाही. ही राज्यातील निवडणूक आहे. केंद्र स्तरावरील मुद्दे लोकसभेच्या निवडणुकीत महत्त्वाचे असतात. आता राज्यातील निवडणूक राज्यातील मुद्यांवर लढवली जाईल.
झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भाजपवर असा आरोप केला की, आपल्या गैरकारभारावरून लक्ष हटविण्यासाठी भाजप राष्ट्रवादासारखे मुद्दे उपस्थित करीत आहे. भूसंपादन आणि बेरोजगारी यासारख्या राज्याच्या मुद्यांवर निवडणूक लढविली जाईल, असा दावाही ते एकीकडे करीत आहेत. सोरेन म्हणाले की, छोटा नागपूर टेनेन्सी आणि संथाल परगना टेनेन्सी अॅक्टचे मुद्दे आपण जम्मू- काश्मीर आणि गुजरातमध्ये उपस्थित करू शकत नाहीत. वन अधिकारांबाबत आम्ही बाहेरच्या ठिकाणी बोलू शकत नाही. राज्याचे मुद्दे राज्याच्या निवडणुकीत नाहीत, तर मग कुठे उपस्थित करायचे? जर प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादाचीच चर्चा करायची, तर मग राज्याचे प्रश्न कुठे उपस्थित करायचे? असे सवालही सोरेन यांनी केले.
विरोधी पक्षांच्या आघाडीचे सोरेन हे नेतृत्व करीत आहेत. यात झामुमो, काँग्रेस आणि राजद यांचा समावेश आहे. झामुमो ४३, काँग्रेस ३१, तर राजद ७ जागा लढवीत आहे. अयोध्याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निकालावर परिणाम होऊ शकतो काय? असा सवाल केला असता ते म्हणाले की, हे प्रकरण जुने आहे आणि समाप्त झाले आहे. राज्याच्या निवडणुकीशी याचा संबंध नाही. न्यायालयाने निकाल दिला आहे आणि याचा राजकीय मुद्दा बनविणे योग्य नाही.
सोरेन म्हणाले की, राज्यातील रघुबर दास सरकारकडून लोकांची आता फसवणूक केली जाऊ शकत नाही आणि लोक आता बदल करण्यासाठी मतदान करणार आहेत. भाजप आणि मित्रपक्षांबाबत बोलताना ते म्हणाले की, आॅल झारखंड स्टुडंट युनियन भाजपसोबत सत्तेत होता; पण त्यांनी आता भाजपविरुद्ध उमेदवार दिले आहेत. जेडीयू स्वतंत्रपणे लढत आहे. एजेएस यू भाजपची बी टीम आहे.
एनडीएची घटक पक्ष असलेली एजेएसयू पार्टी १५ ठिकाणी समोरासमोर लढत आहे. लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी गत आठवड्यातच स्पष्ट केले की, आमचा पक्ष ५० जागा स्वबळावर लढणार आहे.
बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या वाढल्या
सोरेन यांनी असा आरोप केला की, भाजपकडे कोणताही मुद्दा नाही. त्यांच्या पाच वर्षांच्या काळात राज्यात विनाश झाला आहे. लोकांना ते उत्तर देऊ शकत नाहीत. त्यामुळे ते भावनिक मुद्दे उपस्थित करीत आहेत. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. महागाई वाढली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत.
सोरेन म्हणाले की, बंदुकीच्या आणि बळाच्या जोरावर भूसंपादन केले जात आहे. अनेक शेतकऱ्यांचा बळी जात आहे. आम्ही हा प्रकार समाप्त करू. आम्ही रोजगार देण्याचा शब्द दिला आहे. आम्ही पाच लाख नवे रोजगार निर्माण करू आणि खासगी नोकरीत झारखंडच्या युवकांना ७५ टक्के नोकºया देऊ. सरकारी नोकºयात महिलांना ५० टक्के आरक्षण देऊ.