"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 08:31 AM2024-06-16T08:31:02+5:302024-06-16T08:31:57+5:30
BJP On Fuel Price Hike : सरकारने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३ रुपये आणि डिझेलच्या दरात ३.२० रुपयांची वाढ केली आहे.
बंगळुरु : कर्नाटक राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. सरकारने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३ रुपये आणि डिझेलच्या दरात ३.२० रुपयांची वाढ केली आहे. 'कर्नाटक सेल्स टॅक्स' (KST) मध्ये दुरुस्ती केल्यानंतर ही वाढ झाली आहे. कर्नाटक राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, पेट्रोलवरील विक्रीकरात २९.८४ टक्के आणि १८.४ टक्के वाढ केली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढीवरून भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधत खटाखट, टकाटक लूट सुरू झाल्याचे म्हटले आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, कर्नाटकात परिस्थिती बदलत आहे. याचबरोबर पेट्रोल ३ रुपयांनी महागले आहे. तर टकाटक-टकटक डिझेल ३.२० रुपयांनी महागले आहे.
खटा खट, टका टक लूट शुरू… pic.twitter.com/gHUHiMaVgC
— Amit Malviya (@amitmalviya) June 15, 2024
भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत म्हटले की, आज काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. काँग्रेस पक्ष म्हणतो की देशात महागाई आहे आणि मग काँग्रेस आणि त्यांचीच राज्य सरकारे पेट्रोल-डिझेलचे दर वाढवतात.
शहजाद पूनावाला पुढे म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेस सरकारने शेतकरी विरोधी, सामान्य माणसांविरोधात आदेश, फतवा, जजिया कर पारित केला आहे आणि आता त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. दरम्यान, पेट्रोलवरील विक्रीकर २५.९२ टक्क्यांवरून २९.८४ टक्के करण्यात आला आहे. तर डिझेलवर १४.३ टक्क्यांवरून १८.४ टक्के करण्यात आला आहे. या वाढीनंतर बंगळुरूमध्ये पेट्रोलचा दर ९९.८४ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ८५.९३ रुपये प्रति लिटर झाला आहे.