Amit Shah : "मोदी सरकार ५ वर्षे टिकणार नाही असं म्हणणाऱ्यांना..."; अमित शाहांचा विरोधकांवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 03:05 PM2024-08-04T15:05:53+5:302024-08-04T15:17:11+5:30
BJP Amit Shah : चंदीगडमध्ये स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत बांधलेल्या २४×७ पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी चंदीगडमध्ये स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत बांधलेल्या २४×७ पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. "विरोधकांना हवं ते म्हणू द्या, तुम्ही चिंता करू नका. २०२९ मध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येईल. मोदी सरकार ५ वर्षे टिकणार नाही असं म्हणणाऱ्या विरोधकांना मी सांगू इच्छितो की, मोदी सरकार पूर्ण ५ वर्षे टिकेल" असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
"दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला. काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचे कामही पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. तसेच देशातील जनतेने मोदींच्या कार्यावर विश्वास ठेवला आहे. भविष्यातही लोक त्यांच्या कामावर विश्वास ठेवतील" असं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे. गृहमंत्र्यांच्या चंदीगड दौऱ्यादरम्यान पोलिसांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय पदाधिकारी आशिष गजनवी यांना ताब्यात घेतलं होतं.
#WATCH | Chandigarh: Union Home Minister Amit Shah says, "...I assure you that let the opposition do whatever it wants to do, in 2029 NDA will come, Modi ji will come. They (opposition) do not know that BJP has won more seats in this election than the number of seats Congress got… pic.twitter.com/6yKaFJnHWi
— ANI (@ANI) August 4, 2024
गजनवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेसहा वाजता पोलीस त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना सोबत येण्यास सांगितलं, पण ते गेले नाहीत. यानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरातून बाहेर पडण्यापासून रोखलं. गजनवी आणि त्यांची टीम नेहमीच गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात निदर्शने करत आहे. हे लक्षात घेऊन यावेळी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.
मनीमाजरा पाणीपुरवठा प्रकल्पाचं उद्घाटन अमित शाह यांनी केलं. यासाठी ७५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. याचा फायदा परिसरातील एक लाखाहून अधिक लोकांना होणार आहे. 'स्मार्ट सिटी मिशन' अंतर्गत, सतत उच्च दाब पुरवठ्याद्वारे पाण्याचा साठा कमी करून अपव्यय रोखणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे. याशिवाय अमित शाह यांनी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे.