सूरतमध्ये जोरदार राडा! भाजपा आणि आपचे कार्यकर्ते भिडले; गाड्या फोडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 10:09 PM2022-06-27T22:09:28+5:302022-06-27T22:09:50+5:30
गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पूर्वीच तिथे राजकीय राडे सुरु झाले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात गुजरातच्या सूरतमधूनच भूकंप आलेला असताना तिथूनच एक महत्वाची बातमी येत आहे. सुरतमध्ये तुफान राडा झाला आहे. भाजपा आणि आपचे कार्यकर्ते भिडले असून आप नगरसेवकांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पूर्वीच तिथे राजकीय राडे सुरु झाले आहेत. यामध्ये आप आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होण्याचे प्रकार समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी आपचे चार नगरसेवक सूरत महापालिकेच्या शाळेतील प्रवेश महोत्सवासाठी गेले होते. तिथे आधीपासूनच गुजरात सरकारचे माजी मंत्री आणि आमदार कुमार भाई कानानी आले होते. आपच्या नगरसेवकांनी शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नसल्याचा आरोप केला, यावरून भाजपा आणि आपच्या समर्थकांमध्ये वाद सुरु झाला आणि प्रकरण हाणामारीवर गेले.
आपचे धर्मेश भंडेरी यांनी आरोप केला की, माजी मंत्र्यांच्या समोरच आमच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांवर जिवघेणा हल्ला करण्यात आला. आमच्या कारच्या काचा फोडण्यात आला. भाजपा आम्हाला घाबरू लागली आहे, यामुळे आमच्यावर हल्ले करू लागली आहे.
तर दुसरीकडे काकानी यांनी आपचे नगरसेवकांनीच गुंडगिरी सुरु केल्याचा आरोप लावला. दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या या हाणामारीची तक्रार कपोद्रा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.