अहंकारामुळेच भाजपा व काँग्रेसचा पराभव - केजरीवाल
By Admin | Published: February 10, 2015 12:25 PM2015-02-10T12:25:21+5:302015-02-10T12:27:53+5:30
अहंकारामुळेच भाजपा व काँग्रेसचा पराभव झाला असून यातून बोध घेत विजयानंतर कार्यकर्त्यांनीही अहंकार बाळगू नये असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - दिल्ली विधानसभा निवडणुकीत भरभरुन प्रतिसाद देणा-या जनतेचा मी आभारी असून कार्यकर्त्यांनी या विजयाचा अहंकार बाळगू नये. अहंकारामुळेच भाजपा व काँग्रेसचा पराभव झाला असून आता आपणही अहंकार दाखवला तर पाच वर्षानंतर जनता आपल्याला साथ देणार नाही असे अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. केजरीवाल यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी 'पाच साल केजरीवाल' असा घोषणा घेत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. दिल्लीकरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अथक मेहनतीसाठी मी त्यांचा आभारी आहे असे सांगत केजरीवाल यांनी भाषणाची सुरुवात केली. मी एकटा काहीच करु शकत नाही, आपण सर्वांनी एकत्र मिळून काम केले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. दिल्लीत गरीब व श्रीमंत अशा दोन्ही घटकांचे सरकार असेल, आमचे सरकार दिल्लीला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवेल असे आश्वासनही त्यांनी दिले.