हरियाणात भाजप-जेजेपी विभक्त; सैनी मुख्यमंत्री, मनोहर लाल खट्टर यांना पदावरुन का हटवले?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 06:03 AM2024-03-13T06:03:22+5:302024-03-13T06:04:59+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरयाणा दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना हटवून कुरुक्षेत्रचे खासदार नायबसिंह सैनी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली.
बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क, चंडीगड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरयाणा दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना हटवून कुरुक्षेत्रचे खासदार नायबसिंह सैनी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली. भाजपच्या लोकसभा निवडणूक तयारीचा भाग म्हणून या घडामोडीकडे पाहिले जात आहे. यानंतर राज्यातील साडेचार वर्षे जुनी भाजप-जेजेपी युती तुटली.
भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत सैनी यांची एकमताने नेतेपदी निवड केल्यावर राजभवनात राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तत्पूर्वी मनोहर लाल खट्टर यांनी राजभवनात जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. सैनी यांनी मंत्रिमंडळात पाच मंत्र्यांचा समावेश केला. मुख्यमंत्री सैनी यांनी ४८ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना दिले. तसेच उद्याच बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली.
जेजेपी सत्तेबाहेर
- खट्टर यांच्या सरकारचा भाग असलेला जननायक जनता पक्ष (जेजेपी) वेगळा झाल्यानंतर जेजेपीचे नेते तथा उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्यासह तिन्ही मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर पडले आहेत.
- जेजेपीने युतीसाठी भाजपकडे दोन जागांची मागणी केली होती; पण भाजपने एकच जागा देऊ केली होती. त्यामुळे साडेचार वर्षे जुनी युती तुटली.
खट्टर यांना पदावरुन का हटवले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरयाणा दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी खट्टर यांचा राजीनामा घेतल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्री बदलल्याशिवाय राज्यातील लोकसभेच्या जागा जिंकणे कठीण असल्याचा अहवाल नेतृत्वाला देण्यात आला. त्यामुळेच त्यांना हटवल्याचे जाणकारांचे मत आहे. सैनी यांना मुख्यमंत्री करून भाजपने मागासवर्गीयांची मने जिंकण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.
आता देशभरात आली बदलाची वेळ : काँग्रेस
हरयाणातील वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशभरात परिवर्तनाची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसतर्फे व्यक्त करण्यात आली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, हरयाणातील अराजकता ही शेतकरी, तरुण आणि कुस्तीपटूंच्या मुद्द्यांवरून वाढत चाललेल्या संतापाचे प्रतिबिंब आहे. बदलाची वेळ आली आहे.