Delhi Election Result: 2 वर्षांत एनडीएनं 6 राज्यांत गमावली सत्ता, दिल्लीच्या निकालानं वाढवलं भाजपाचं टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 09:05 AM2020-02-12T09:05:31+5:302020-02-12T09:49:37+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला असून, आम आदमी पार्टीकडे जनतेनं तिसऱ्यांदा सत्ता सोपवलेली आहे.
नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला असून, आम आदमी पार्टीकडे जनतेनं तिसऱ्यांदा सत्ता सोपवलेली आहे. पण या निकालानं भाजपाचं टेन्शन वाढवलं आहे. देशाच्या राजधानीच्या विधानसभेची किल्ली भाजपाला कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या हातात ठेवायची होती. परंतु त्यात त्यांना यश आलेलं नाही. विशेष म्हणजे 70 जागांच्या या दिल्ली विधानसभेत भाजपाला 10चा आकडाही गाठता आलेला नाही. भाजपा 3हून वाढून 8 जागांवर पोहोचली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला फक्त हरणायाची सत्ता काबिज करता आलेली आहे. उर्वरित राज्यांतील सत्ता त्यांच्या हातून निसटली आहे.
गेल्या दोन वर्षांच्या भाजपा आणि एनडीएच्या कामगिरीवर नजर टाकल्यास त्यांच्या हातून सहा राज्यांतील सत्ता गेली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी चार राज्यांच्या निवडणुका झाल्या होत्या. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराम या चारही राज्यांत भाजपाला सत्ता मिळवता आलेली नाही. लोकसभा निवडणुकीदरम्यान आणखी एक राज्य भाजपा आणि एनडीएपासून दुरावलं. आंध्र प्रदेशमध्ये भाजपा तेलगु देसमबरोबर सत्तेत होती. परंतु निवडणुकीपूर्वीच टीडीपीनं भाजपाची साथ सोडली. विधानसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशच्या सत्तेतून भाजपाबरोबर टीडीपीसुद्धा बाहेर गेली.
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकांत महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये भाजपाला हरियाणात सत्ता मिळाली, पण झारखंड राज्य त्यांनी गमावलं. महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपाला विरोधी पक्षात बसावं लागलं.अशा प्रकारे एकापाठोपाठ एका राज्यातून भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे.
दिल्लीत भाजपाचा लाजिरवाणा पराभव
दिल्लीत भाजपाला पुन्हा एकदा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत झालेल्या पराभवामुळे भाजपाची चिंता वाढलेली आहे. भाजपाला दिल्लीतली सत्ता हवी होती, त्यासाठी त्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. परंतु आम आदमी पार्टीनं पुन्हा एकदा 62 जागांवर विजय मिळवत सत्ता हस्तगत केली. दोन वर्षांपूर्वीचा विचार केल्यास डिसेंबर 2017मध्ये भाजपा आणि त्यांचे मित्र पक्षांची 19 राज्यांमध्ये सत्ता होती.