भाजप व विरोधकांत सोमवारी शक्तीपरीक्षा; लोकलेखा समितीच्या सदस्यत्वासाठी होणार निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 05:12 AM2018-08-03T05:12:50+5:302018-08-03T05:13:07+5:30
सत्तारुढ भाजप आणि विरोधी पक्षात राज्यसभेत सोमवारी शक्तीपरीक्षा पहायला मिळणार आहे. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर विरोधी पक्षांना भलेही अपयश आले असेल, पण राज्यसभेत भाजपसाठी अनुकूल वातावरण नाही.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : सत्तारुढ भाजप आणि विरोधी पक्षात राज्यसभेत सोमवारी शक्तीपरीक्षा पहायला मिळणार आहे. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर विरोधी पक्षांना भलेही अपयश आले असेल, पण राज्यसभेत भाजपसाठी अनुकूल वातावरण नाही. अशात लोकलेखा समितीच्या सदस्यत्वासाठी निवडणुकीसाठी भाजपने दोघांना रिंगणात उतरविले आहे.
राज्यसभेत ५० सदस्य असलेल्या काँग्रेसचा तेलुगू देसमचे सी.एम. रमेश यांना पाठिंबा आहे. राज्यसभेच्या कोट्यातील दोन जागेसाठी होणाऱ्या लोकलेखा समितीच्या सदस्यत्वपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने जनता दल यूनायटेडचे भूपेंद्र यादव व हरवंश यांना उतरविले आहे. २४४ सदस्यीय सभागृहात तेलुगू देसमचे सहा सदस्य आहेत. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा, बसपा, द्रमुक, राष्ट्रीय लोकदल आणि अन्य विरोधी पक्षांनी रमेशना पाठिंबा दिला आहे. भाजपकडे शिवसेनेचे ३ सदस्य वगळता १०८ जणांचा पाठिंबा आहे. टीआरएस (६) आणि वायएसआर काँग्रेस (२) यांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. ते भाजपसोबत गेले तर, भाजपकडे ११६ जणांचे संख्याबळ होईल. भाजपसाठी हे अत्यंत कठीण काम आहे. रमेश भारदस्त उमेदवार आहेत आणि त्यांना मतदान करण्याच्या सूचना विरोधी पक्षांनी सदस्यांना दिल्या आहेत.
या दोन्ही जागा ताब्यात घेण्यासाठी भाजप प्रयत्न करत असून ९ सदस्य असलेल्या बिजू जनता दलाकडे त्यांची नजर आहे. तथापि, पीडीपीचे दोन सदस्य विरोधात मतदान करू शकतात. बीजेडी तटस्थ राहणार की, भाजप उमेदवाराला मतदान करेल हे स्पष्ट नाही. अण्णाद्रमुकचे सभागृहात १३ सदस्य असून आहेत. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी अण्णाद्रमुकचे नेते उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांचा अपमान केल्याने ते सदस्य नाराज आहेत. पनीरसेल्वम यांना वेळ देऊ नही त्या भेटल्या नव्हत्या. पण अण्णाद्रमुकचे मन वळविण्यात यश येईल, असे भाजपला वाटत आहे.