'BBC सर्वात भ्रष्ट संघटना'; भाजप नेत्यांनी बीबीसीवर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 04:29 PM2023-02-14T16:29:56+5:302023-02-14T16:36:58+5:30
'बीबीसी'च्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक दिली आहे.
'बीबीसी'च्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक दिली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले आहेत. यावर काँग्रेसने भाजप सरकारवर टीका केली, यावरुन आता भाजपच्या नेत्यांनी बीबीसीवर निशाणा साधला आहे. 'बीबीसी ही जगातील सर्वात भ्रष्ट संघटना असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केला आहे.
दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी या कारवाईवरून सरकारवर निशाणा साधल्याबद्दल काँग्रेससह विरोधी पक्षांना फटकारले. यावेळी त्यांनी 'माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही बीबीसीवर बंदी घातली होती अशी आठवण करुन दिली. "आयकर विभागाने बीबीसीवर केलेली कारवाई नियमांनुसार आणि घटनेनुसार केली जात आहे.', असंही गौरव भाटिया म्हणाले.
'भारत संविधान आणि कायद्यानुसार चालतो आणि आज केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. “आयकर विभाग पिंजऱ्यातला पोपट नाही. ते त्यांचे काम करत आहेत, असंही भाटिया म्हणाले .
'कोणतीही एजन्सी मग ती मीडिया ग्रुप असो, जर ती भारतात काम करत असेल आणि तिने काही चुकीचे केले नसेल आणि कायद्याचे पालन केले असेल तर घाबरण्याचे कारण काय? 'आयकर विभागाला त्यांचे काम करू द्यावे. दूध का दूध पानी का पानी होईल, असंही भाजपचे प्रवक्ते भाटिया म्हणाले.