वसुंधरा राजेंच्या पाठीशी भाजप

By admin | Published: June 22, 2015 11:54 PM2015-06-22T23:54:05+5:302015-06-22T23:54:05+5:30

सध्या फरार असलेले आयपीएल घोटाळ्यातील आरोपी ललित मोदी यांना व्हिसा मिळवून देण्यासाठी छुपी मदत केल्याच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या

BJP backed Vasundhara Raje | वसुंधरा राजेंच्या पाठीशी भाजप

वसुंधरा राजेंच्या पाठीशी भाजप

Next

जयपूर : सध्या फरार असलेले आयपीएल घोटाळ्यातील आरोपी ललित मोदी यांना व्हिसा मिळवून देण्यासाठी छुपी मदत केल्याच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची सोमवारी भाजपप्रणीत केंद्र सरकारने जोरदार पाठराखण केली. वसुंधरा राजे यांच्या पाठीशी भाजप आणि केंद्र सरकार खंबीरपणे उभे आहे. पक्ष त्यांच्यासोबत होता, आजही आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
ललित मोदीप्रकरणी गोत्यात आलेल्या राजेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. ललित मोदींनी वसुंधरा यांचे चिरंजीव दुष्यंत यांच्या एका कंपनीत २००८ मध्ये ११.६३ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याच्या आरोपांमुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. अशा स्थितीत आतापर्यंत भाजपचा कुठलाही नेता स्पष्टपणे राजेंच्या समर्थनार्थ पुढे आला नव्हता; पण सोमवारी नितीन गडकरी एक दिवसाच्या दौऱ्यावर जयपूरला पोहोचले आणि राजेंच्या पाठीशी पक्ष आणि सरकार भक्कमपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजेंवरील आरोप निराधार आणि बिनबुडाचे आहेत. या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही, असा दावाही गडकरींनी यावेळी केला.
मुख्यमंत्री कार्यालयाने एक पत्रक जारी करून याबाबतची माहिती दिली. वसुंधरा राजे यांच्यावरील आरोप कुठल्याच दृष्टीने तर्कसंगत नाही. राजे यांचे चिरंजीव दुष्यंतवरील आरोपातही तथ्य नाही. कारण ती व्यावसायिक देवाण-घेवाण आहे आणि त्याचे आयकर रिटर्नही भरण्यात आले आहे. कुणाकडूनही कर्ज घेणे गुन्हा नाही. एका आर्थिक व्यवहाराला राजकीय वादाचे रूप देणे दुर्दैवी आहे. मग ते राजेंबाबत असो वा सुषमा स्वराज यांच्याबाबत असो, असे गडकरी यांनी म्हटले आहे.
वसुंधरा राजे कायदेशीरदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या आणि तार्किकदृष्ट्या आपल्या ठिकाणी योग्य आहेत. या प्रकरणात त्यांनी काहीही चूक केलेली नाही. कुठलाही भ्रष्टाचार वा गैरव्यवहार नाही. माझ्या मते, खोटे आरोप लावून अशाप्रकारे एखाद्याची प्रतिमा मलिन करण्याचे राजकारण कदापि योग्य नाही, असेही गडकरी म्हणाले. (वृत्तसंस्था)


 

Web Title: BJP backed Vasundhara Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.